पोलिसांचे गैरवर्तणुक प्रकरणी वकील संघाचे विरोध प्रदर्शन
गोंदिया :- राज्य घटनेने दिलेल्या अधिकारानुसार चारही स्तंभातील प्रतिनिधींना विशेष अधिकार व जबाबदाऱ्या असतात. त्यात एकमेकाप्रती आदर व शिस्त हे अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. मात्र काही ठिकाणी परस्पर विरुद्ध घटना घडल्याने एक वेगळेच वातावरण पाहायला मिळते, अशीच एक घटना स्थानिक गोंदिया शहर पोलीस स्टेशन येथे (दि. 15 सप्टेंबर)रोजी घडली. झाले असे की,एडवोकेट मनीष नेवारे हे आपल्या पक्षकाराला भेटायला गेले असता तेथे उपस्थित असलेले पोलीस कर्मचारी व पोलीस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांच्यात शाब्दिक चकमक झाली. या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाले आहे त्यात पोलीस निरीक्षकांनी रागाच्या भारात “याला आत घाला ‘ असे बोलत चक्क वकिलांनाच दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच गोंदिया जिल्हा बार असोसिएशनच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी हा अपमान एका वकिलाचा नसून संपूर्ण महाराष्ट्रातील वकिलांच्या हक्काचे हनन होत आहे. यापुढे पोलीस विभागाकडून या प्रकारची कोणतीही गैरवर्तणूक खपवून घेतली जाणार नाही हा संदेश देण्याच्या निमित्ताने सर्व पदाधिकाऱ्यांनी (दि.25)रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत मोर्चा काढून विरोध प्रदर्शन केले. संघटनेचे शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन संदर्भित घटने विरोधात निवेदन देऊन विस्तृत चर्चा केली. सदर घटना निंदनीय असून त्याचे कोणीही समर्थन करू शकणार नाही पोलीस विभागातर्फे मी आपली माफी मागतो त्यावर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित पोलीस निरीक्षकाला का उपस्थित केले नाही असा सवाल करताच, ते मी करू शकत नाही असा जवाब पोलीस अधीक्षकांनी दिला अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष एड सी के बढे व शिष्टमंडळाने दिली. यावेळी उपाध्यक्ष एडवोकेट आरती भगत, सचिव एडवोकेट सचिन बोरकर, कोषाध्यक्ष एड परवेज शेख, एड राजकुमार बोंबार्डे सहित शेकडो वकीलांचा ताफा उपस्थित होता. विशेष म्हणजे या घटनेची गंभीरता ओळखून अखिल भारतीय संयुक्त अधिवक्ता मंच महाराष्ट्र या संघटनेचे सुद्धा समर्थन असून नागपूर जिल्ह्याच्या वतीने अध्यक्ष एडवोकेट विलास राऊत, एड सीएच शर्मा,एड वासे, एड सुनील लाचारवार आदी वकील संघ उपस्थित होते. या प्रकरणावर पोलीस अधीक्षकांतर्फे पुढे कोणती कारवाई करण्यात येईल त्या प्रतीक्षेत सगळ्यांच्या नजरा लागून आहेत.