स्थानिक प्रशासनाच्या विरोधात युवक चढला टंकीवर
गोंदिया:- वाढता भ्रष्टाचार व त्यामुळे स्थानिकांना होणाऱ्या त्रासाचा अंत झाल्यास काय परिणाम घडू शकतात याचे ज्वलंत उदाहरण या घटनेत पहावयास मिळाले. झाले असे की, मागील ग्रामसभेमध्ये घेण्यात आलेल्या ठरावातील माहिती व जनतेने सांगितलेल्या कामाची अंमलबजावणी होत नसल्याची खंत मनात घेऊन तालुक्यातील ग्रामपंचायत अर्जुनी येथील नरेंद्र गजभियेने गावातीलच पाणी टंकी वर चढून(दि.11ऑक्टो.)रोजी स्थानिक प्रशासना विरोधात आवाज उठविला. त्याच्या मागणीनुसार ग्रामसेवकाच्या हलगर्जीपणामुळे स्थानिक नागरिकांना कमालीच्या त्रास सहन करावा लागत आहे व ग्रामसेवकाचे कार्य समाधानकारक नसल्याने त्वरित त्याची बदली करण्यात यावी व जिल्हा परिषद शाळेतील शाळा समितीची निवड सुद्धा नियमानुसार झालेली नसल्याचे त्याने सांगितले. या प्रकरणाची माहिती मिळताच रावणवाडी येथील पोलीस प्रशासनाने घटनास्थळ गाठून सुरक्षेची उपायोजना केली. पंचायत समिती गोंदिया येथील विस्तार अधिकारी देखील घटनास्थळी पोहोचले व त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणी केल्यानंतर तब्बल पाच तासानंतर गजभिये खाली उतरला. ग्रामविकासाचे लक्ष्य साधत असतांना प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना अनेकदा प्रशिक्षण दिले जाते त्या प्रशिक्षणात ग्राम विकासाच्या दृष्टीने अनेक बाबी पुढे येत असतील, मात्र त्यातून काय बोध घेण्यात आला हे कळायला मार्ग नाही. यानिमित्ताने अश्या घटना भविष्यात होऊ नयेत व निरपराध नागरिकांचे बळी जाऊ नये त्यासाठी प्रशासन काय पाऊल उचलते हे पाहणे गरजेचे ठरेल.