राजकीय

पालकमंत्र्याच्याहस्ते नवनिर्मित पोलीस स्टेशनचे लोकार्पण

गोंदिया प्रतिनिधी :- महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर मध्यप्रदेश सीमेलगत असलेल्या रावणवाडी पोलीस स्टेशनची स्थापना 2010 ला झाली होती तेव्हापासून हे पोलीस स्टेशन हक्काच्या शासकीय इमारतीच्या प्रतीक्षेत होते. या पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकूण 68 गाव येतात तेथील जनतेच्या संरक्षणाच्या दृष्टीने सदर स्टेशन अतिशय महत्त्वाचे मानले जाते. हे पोलीस स्टेशन कोहमारा ते जबलपूर महामार्गावर असल्याने आंतरराज्यीय गुन्ह्यांचे प्रमाण अधिक असते. याच पोलीस स्टेशनच्या लोकार्पण सोहळ्याचे कार्यक्रम (दि.27)रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते पार पडले. यासोबतच गृह विभागाकडून गोंदिया जिल्हा पोलिसांच्या वाहतुकीसाठी 29 गाड्या व दोन बसेस देण्यात आल्या. या कार्यक्रमाला विधान परिषद सदस्य डॉ.अभिजीत वंजारी, स्थानिक आमदार विनोद अग्रवाल, मोरगाव अर्जुनी क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते तर लोकरपणापूर्वी मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. त्यात जिल्ह्यातील शेकडो स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्या स्पर्धकांना पाहुण्यांचे हस्ते प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक देण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांनी सांगितले की पाच कोटी रुपयांच्या निधीने सदर इमारतीचे बांधकाम करण्यात आले व येथे येणाऱ्या फिर्यादी व आरोपींसाठी उत्तम सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या, त्यामुळे कुणावरही अन्याय होणार नाही याची हमी त्यांनी दिली. यावेळी क्षेत्रातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, पोलीस पाटील व स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी केले, सूत्रसंचालन अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांनी केले तर कार्यक्रमाची सांगता पोलीस बँड पथकाने सादर केलेल्या राष्ट्रगीताद्वारे झाली.