गुन्हेगारी बातमी

निष्काळजीपणा सिद्ध झाल्याने सडक अर्जुनी न्यायालयाने ठोठावली आरोपीस शिक्षा

सडक अर्जुनी :- सदर गुन्हा दि. ०३/०९/२०१६ रोजी राका/ पळसगाव ता. सडक अर्जुनी येथे घडला होता. आरोपी रामकृष्ण श्रावण चांदेवार व देवराम श्रावण चांदेवार यांनी त्यांच्या मालकीच्या जागेत बोअरवेल साठी घेण्यात आलेला खड्डा न बुजवता तसेच त्यास संरक्षीत कडा न बांधता खुलाच सोडून दिला होता त्या खड्डयात मृतक विक्की खुशाल दोनोडे, वय ३ वर्षे ३ महिने याचा पडून मृत्यू झाला. फिर्यादी सिंधुबाई बे. नारायण दोनोडे यांच्या फिर्यादीवरून कलम भा. द. वि. कलम ३३६,३०४(अ),३४ अंतर्गत गुन्हा दाखल करून प्रकरण न्यायालयात सुरू होते.
बऱ्याच दिवसांन पासून प्रलंबित असलेल्या बहूचर्चित खटल्याचा न्यायनिर्णय दिनांक २६/०३/२०२४ रोजी डॉ. विक्रम अं. आव्हाड, दिवाणी न्यायाधीश व प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी सडक अर्जुनी यांनी दिला आणि गुन्ह्यातील आरोपी क्र. १ रामकृष्ण श्रावण चांदेवार वय ७४ वर्ष यांस सदर गुन्ह्यात दोषी ठरवून दोन महिने तुरुंगवासाची व ७००/- रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. आरोपी क्र. २ याचा पूर्वीच मृत्यू झाला असून आरोपी क्र. ३ व ४ यांची पुरेशा पुराव्या अभावी निर्दोष सुटका करण्यात आली.
या खटल्यात एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले होते. सरकार तर्फे सरकारी अभियोक्ता श्री ओ. एस. गहाने यांनी बाजु मांडली, गुन्ह्याचा तपास तपासी अधिकारी पो. नि. श्री केन्द्रे यांनी केले तर न्यायालयात पैरवीचे कामकाजात पो. नि. मंगेश काळे यांच्या मार्गदर्शनात पोलिस हवालदार श्री भारत रामटेके यांनी मदत केली.