शैक्षणिक

जिल्हा परिषद शाळा मोरगाव येथे पाचवीच्या प्रवेशासाठी लागली पालकांची रांग

अर्जुनी मोरगाव:- तालुका अर्जुनी मोरगाव येथील एक उपक्रमशील शाळा म्हणून, नावारुपास आलेली जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा मोरगाव येथे इयत्ता पाचवीच्या प्रवेशासाठी पालकांची रांग लागल्याचे दिसून येत आहे.
सविस्तर वृत्त असे की मागील शैक्षणिक क्षेत्रात अदानी फाउंडेशन तर्फे आयोजित माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा मोरगाव ही एक गुणवत्तापूर्वक शाळा म्हणून तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकाविलेले होते. तसेच चालू शैक्षणिक क्षेत्रात मुख्यमंत्री माझी शाळा -सुंदर शाळा या उपक्रमात सदर शाळा विविध उपक्रम राबवून तालुकास्तरावर तृतीय क्रमांक पटकाविले .शाळेत परिपूर्ण उच्च शिक्षित अनुभवी शिक्षक वृंद, स्वतंत्र संगणक कक्ष विज्ञान प्रयोगशाळा पिण्याचे स्वच्छ पाणी ,अत्याधुनिक डिजिटल बोर्ड द्वारे अध्ययन- अध्यापन, उत्तम बैठक व्यवस्था, स्वच्छतागृह व शौचालयाची उत्तम व्यवस्था अशा अनेक भौतिक व शैक्षणिक सुविधेमुळे पालक सदर शाळेकडे आकर्षित झाल्याचे दिसून येत आहे. शालेय प्रशासनाने शैक्षणिक गुणवत्ता वाढीबरोबरच विविध सहशालेय उपक्रमांचे नियोजन व अंमलबजावणी अतिशय प्रभावीपणे राबविल्याने , शालेय विद्यार्थ्यांचा शैक्षणिक ,सामाजिक सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांमध्ये चांगली झेप घेतल्याचे जनमानसातुन प्रतिक्रिया येत आहेत. सदर उपक्रमशील शाळेत ग्राम निलज, महालगाव, बरडटोली, अर्जुनी /मोर या गावातील पालकांनी आपल्या पाल्यांच्या प्रवेशासाठी रांग लावलेली आहे . जिल्हा परिषद शाळेत प्रवेशासाठी इच्छुकांची गर्दी हे तालुक्यातील एकमेव उदाहरण आहे.

एकीकडे खाजगी शाळा विद्यार्थ्यांच्या शोधासाठी पालकांना विविध प्रलोभन देऊन परिसरात विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी भटकत आहेत तर दुसरीकडे प्रलोभनाशिवाय जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा मोरगाव येथे प्रवेश घेण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून येत आहे.शाळेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम याचे प्रभावी नियोजन व अंमलबजावणी तसेच गटशिक्षणाधिकारी अनिल चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली सदर शाळेची वाटचाल सुरू असून शिक्षक वृंदांच्या उत्कृष्ट धडपडीमुळे शाळा प्रगतीपथावर जात असल्याचे समाधान वाटत आहे
उच्च श्रेणी मुख्याध्यापक
रेखा विजय गोंडाने

सदर शाळेच्या संदर्भाने परिसरातील अनेक शिक्षकांनी जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा मोरगाव च्या गुणवत्तेबद्दल माहिती दिली त्या अनुषंगाने मी माझ्या पाल्यास, माझ्या गावापासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा मोरगाव येथे माझ्या पाल्यांचे प्रवेश निश्चित केलेले आहे .
पालक
दिलीप नाईक महालगाव