रोजगार

रोजगार हमी कामावर डेंग्यू बाबत जनजागृती

आरोग्यवर्धीनी उपकेंद्र कुंभीटोलाचे आरोग्य पथक सुकळी रोजगार हमी कामावर

नवेगावं बांध :- डेंग्यू हा अतिशय गंभीर आजार आहे. दरवर्षी 16 मे हा दिवस राष्ट्रीय डेंग्यू दिवस म्हणून साजरा केला जातो.हा दिवस साजरा करण्याचा उद्देश लोकांना डेंग्यू आजाराबद्दल माहिती व जनजागृती करणे हा आहे. दि.16 मे राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा करण्यामागचा उद्देश म्हणजे नागरिकांना या आजाराबद्दल जागरुक करणे आणि त्याची लक्षणे, कारणे आणि उपचाराबद्दल माहिती देणे असा होता.या आजाराबाबत लोकांमध्ये पूर्वीपेक्षा जास्त जागरुकता असली तरी या आजाराला बळी पडतात. डेंग्यू या आजाराबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी आणि त्याबाबत अचूक माहिती व्हावी यासाठी शासन स्तरावर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.
दि.16 मे रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र गोठ्णगाव अंतर्गत आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कुंभीटोला येथील आरोग्य पथकाने सुकळी गावातील रोजगार हमी कामावर जावुन आरोग्य सेवे सोबतच डेंग्यु या आजाराबाबतची जनजागृती केली.
. आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कुंभीटोलाचे सामुदायिक आरोग्य अधिकारी तृप्ती गहाणे यांनी समुदायाला डेंग्यू आजार टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय जसे अंग पूर्णपणे झाकणारे कपडे घालावे. मच्छरदाणी व क्रीमचा वापर करावा. साठवलेले किंवा साचलेले पाणी बदलावे तसेच तुंबलेल्या गटारी वाहती करावीत. खाली न करता येणाऱ्या पाणी साठ्यात गप्पी मासे सोडावे. झोपतांना मच्छरदाणीचा वापर करावा. घराच्या छतावरील फुटके डब्बे, टाकाऊ टायर, डिस्पोजल इत्यादींची वेळीच विल्हेवाट लावावी. शौचालयाच्या पाईपला वरच्या टोकाला जाळी अथवा पातळ कपडा नेहमी बांधावा. आपल्या घराबाहेर पाणी साचू देऊ नका, घरातील पाण्याचे सर्व साठे आठवड्यातून एकदा रिकामे करावे.आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा.अंगणात व परिसरातील खड्डे बुझवावे,त्यात पाणी साचणार नाही या बाबतचे आरोग्य शिक्षण मार्गदर्शन केले.
आरोग्य सेवक व्हि.एन. शहारे व आरोग्य सेविका यांनी रखरखत्या ऊन्हात कामे करताना मजुरांना उष्माघात होवु नये म्हणुन कामाचे ठिकाणी रोजगार हमी कामावरील मजुरांची आरोग्य तपासणी केली मजुरांना ओ.आर.एस.पाकिट, पोटदुखी किंवा ताप विरोधी औषधे देऊन प्राथमिक स्वरूपाचे प्रतिबंधात्मक उपाययोजना व आरोग्य शिक्षण दिले.
डेंग्यु जनजागृती कार्यक्रमप्रसंगी सरपंच पंचशीलाबाई मेश्राम ,उपसरपंच ओमप्रकाश मेळे, ग्रामपंचायत सदस्य धम्मदीप मेश्राम,ताम्रध्वज गावराने,रवींद्र मेश्राम,चित्रलेखा मेश्राम, नंदाबाई घरतकर, मनीषा शहारे, भाग्यश्री नरवास ,ग्रामसेवक एम.एस.खडसे, ग्रामरोजगार सेवक वीरेंरा चव्हाण, ग्रामपंचायत परिचर मच्छिंद्र उजवणे यांचेसह गावातील रोजगार सेवक उपस्थित होते.