जिल्ह्यात संविधान जागृती अभियानाला चालना; अतुल सतदेवे यांचा BAARTI कडून सत्कार
गोंदिया : संविधान जागृती अभियान गोंदिया जिल्ह्यात प्रभावी आणि यशस्वीपणे राबविण्यासाठी कार्यरत असलेल्या संविधान मैत्री संघाचे संयोजक अतुल सतदेवे यांचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (BAARTI) गोंदिया यांच्या वतीने स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. स्थानिक एम. जी. पॅरामेडिकल कॉलेज येथे आयोजित BAARTI च्या प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान हा सत्कार सोहळा पार पडला.
कार्यक्रमात संविधान विषयक जनजागृतीसाठी जिल्ह्यात सातत्याने कार्य करणाऱ्या सतदेवे यांच्या योगदानाची दखल घेण्यात आली. या प्रसंगी गोंदिया जिल्हा बार्टी प्रकल्प अधिकारी शारदा कळसकर, तायवाडे, एम जी पॅरामेडिकल कॉलेज संचालक अनिल गोंडाणे तसेच समता दूत मनीष बीजेवार, साजन वासनिक, महेंद्र कटबरीये आदि पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
जिल्ह्यात संविधान विषयक जागरूकता वाढविण्यासाठी कार्यरत असलेल्या व्यक्तींना प्रोत्साहन देणे,समाजातील विविध घटकांपर्यंत संविधानाचे मूल्य, अधिकार आणि कर्तव्ये पोहोचविणाऱ्या उपक्रमांना चालना देणे,युवक व सामाजिक संघटनांना संविधान आधारित कार्यासाठी प्रेरित करणे,स्थानिक जमिनी स्तरावर कार्य करणाऱ्या समर्पित कार्यकर्त्यांचा गौरव करून इतरांसाठी आदर्श निर्माण करणे
अतुल सतदेवे आणि संविधान मैत्री संघ व मित्र संघटना हे जिल्ह्यातील विविध भागात जाऊन नागरिकांमध्ये संविधानाबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन विविध सामाजिक, शैक्षणिक आणि संघटनात्मक स्तरावरून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. जिल्ह्यात जमिनी स्तरावर संविधान मूल्य रुजविण्याचा आदर्श निर्माण करणाऱ्या या उपक्रमामुळे भविष्यात अधिक व्यापक प्रमाणात जनजागृती होईल, असा विश्वास सतदेवे सर आणि त्याचे सहकारी सार्थ करतील असे मत प्रकल्प अधिकारी शारदा कळसकर यांनी व्यक्त करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
