General

ग्रामविकासाची यंत्रणा आता झाली भ्रष्टाचाराचे साधन..? 

 

– खिसे भरण्यासाठी कम्प्युटर दुरुस्तीचे बोगस बिल सादर केले, मुंडीपार येथील ग्रामसभेत.. 

 

 

तिरोडा :- ग्रामसेवकावर एफ आय आर करण्यात यावी अशा आशयाचे पत्र ग्राम पंचायत मुंडीपार तालुका तिरोडा येथील ग्रामपंचायत उपसरपंच सहित इतर सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ग्रामसेवक पी एस बीसेन याचे विरुद्ध तक्रार केली आहे.

 

ग्रामपंचायत मुंडीपार तालुका तिरोडा येथे दिनांक 30 11 2025 च्या मासिक सभेत 18 हजार रुपये किमतीचे कम्प्युटरच्या दुरुस्तीचे बिल मंजुरीसाठी सादर करण्यात आले. मात्र सदर रक्कम हे कुठेही खर्च झाले नसून त्याचे बोगस बिल जोडण्यात येत आहे असे तेथे उपस्थित उपसरपंच तथा इतर सदस्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्या बिलाला विरोध केला व सर्वानुमते सदर बील पास करणार नाही असे ठरावच केले. या विषयाची गंभीरता लक्षात घेत सर्व सदस्यांनी एकच गदारोळ केला व त्याची तक्रार खंडविकास अधिकारी तिरोडा यांना देण्यात आली मात्र आजपर्यंत ग्रामसेवक बिसेन याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात न आल्याच्या संताप मनात घेऊन सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. याविषयी सरपंचांनी मात्र मूकसंमती दर्शविली.

 

सदर ग्रामसेवक हा यापूर्वी च्या ग्रामपंचायतीत सुद्धा भ्रष्टाचाराच्या आरोपात निलंबित असल्याची माहिती आहे. एखाद्या सामान्य नागरिकाची गुन्हेगारी पार्श्वभूमी असली तर कायद्यानुसार त्याच्यावर तडीपारीची कारवाई होते मात्र प्रशासनात वेळोवेळी भ्रष्टाचाराचे प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यावर कोणती कारवाई होते याकडे आता जनतेचे लक्ष लागलेले आहे. ग्रामपंचायतीच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणारे विस्तार अधिकारी खंडविकास अधिकारी यांनी भ्रष्टाचारात लिप्त असणाऱ्या ग्रामसेवकांविषयी बघ्याची भूमिका घेतली आहे का? असा सवाल तेथील नागरिक उपस्थित करू लागले आहे.

 

जनतेच्या कर संकलनातून मिळत असलेला विकास निधी हा अधिकारी कर्मचाऱ्यांचे घर भरण्याचे साधन झाले आहे का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. यावेळी उपसरपंच शिलाबाई रहांगडाले, प्रियकांता पटले, शुभम पटले, रोहिणी पारधी, राजेंद्र साठवणे, पौर्णिमा गजभिये, आदी सदस्यांनी तक्रार केली.