अपघात

तिरोडा येथे दुर्दैवी घटना: शाळेचा गेट कोसळून विद्यार्थिनीचा मृत्यू..!

 

तिरोडा :– तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक आणि दुःखद घटना घडली आहे. तिरोडा येथील नगरपरिषदद्वारा संचालित पीएम श्री राणी अवंतीबाई प्राथमिक शाळा, लोधीटोला येथे शनिवारी (दिनांक ११ एप्रिल) दुपारी शाळेचा गेट अचानक कोसळल्याने पाचवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला.

 

मृत विद्यार्थिनीचे नाव कुमारी निराली मनीष चाफले (वय ११ वर्षे) असे असून, ती शाळेतून सुटल्यानंतर बाहेर पडत असताना ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, शाळेचा मुख्य गेट गेल्या काही वर्षांपासून जीर्ण अवस्थेत होता. त्याच्या दुरुस्तीचा प्रस्तावही करण्यात आला होता. विद्यार्थ्यांना त्या गेटपासून दूर राहण्याच्या सूचना दिल्या गेल्या होत्या, मात्र प्रत्यक्षात त्यावर ठोस उपाययोजना करण्यात आली नव्हती.

 

शनिवारी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी बाहेर पडत असताना अचानक गेट कोसळले. या दुर्घटनेत निराली गेटखाली दबली गेली आणि ती गंभीर जखमी झाली. तिला तातडीने तिरोडा येथील एका खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक झाल्याने पुढील उपचारासाठी गोंदिया येथे रेफर करण्यात आले. मात्र, गोंदियाला नेत असतानाच रस्त्यात तिचा मृत्यू झाला.

 

निराली ही एक अत्यंत हुशार आणि गुणी विद्यार्थिनी होती. तिने राज्यस्तरीय प्रज्ञाशोध स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात चौथा क्रमांक मिळवला होता. काही दिवसांपूर्वीच तिचा पुणे येथे सन्मानही करण्यात आला होता.

 

मिळालेल्या माहितीनुसार, निरालीची आई शुभांगी चौधरी चाफले या त्याच शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

 

ही घटना शाळांमधील सुरक्षेच्या उपाययोजनांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे.