शिकारीचा पाठलाग करताना विहिरीत पडून वाघाचा मृत्यू..!
तिरोडा:- शिकार करण्यासाठी पाठलाग करत असताना चार ते पाच वर्षीय वाघाचा शेतीतील कठळे नसलेल्या विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना दिनांक 12 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास तिरोडा वनपरिक्षेत्रातील माली बीट अंतर्गत पुढील लोहारा परिसरात उघडकीस आली. सदर वाघ हा चार दिवसापूर्वीच विहिरीत पडला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे या घटनेने वन्यजीव संवर्धनाच्या प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून ग्रामीण भागातील उघड्या विहिरीच्या सुरक्षेच्या मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार तिरोडा वनपरिक्षेत्रातील सहवन क्षेत्र वडेगाव अंतर्गत गट क्रमांक 264 माल्ही बीट अंतर्गत कोडेलोहारा येथील शेतकरी रूपचंद किसन कावळे यांच्या शेतीतील विहिरीत वाघ पडल्याची घटना सकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प राखीव क्षेत्राचे जलद बचाव पथक व तिरोडा वन विभागाच्या पथकाने घटनास्थळ गाठून पाहणी केली यावेळी नवेगाव नागझिराचे उपसंचालक प्रीतमसिंग कोडापे, सहाय्यक वनसंरक्षक विजय धांडे, नवीन नागझिराचे सहाय्यक वनसंरक्षक मनीषा चव्हाण तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी रवीकमल भगत यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीच्या आढावा घेतला दरम्यान जिल्हाधिकारी डॉक्टर मंगेश गोंदवले यांनीही घटनास्थळीभेट दिली.
यावेळी एनटीसीए प्रतिनिधी रुपेश निंबार्ते मानव रक्षक सावन बहकर, राजेश बंदिर्गे एलडिओ प्रवीण सोनवणे मेघराज तुलावी यांच्या उपस्थितीत सदर वाघाचे शवविच्छेदन करण्यात आले. सदर वाघ हे शिकारीच्या बेताने पाठलाग करीत असताना अचानकपणे कठडे नसलेल्या विहिरीत पडून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या प्राथमिक अंदाज वर्तविला जात असून पुढील तपास सहायक वन संरक्षक विजय धांडे यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) रवी कमल भगत करीत आहेत.
