Monday, June 1, 2026
Latest:
रोजगार

शासकीय कार्यालयांमधील अप-डाऊन कर्मचाऱ्यांमुळे नागरिक त्रस्त..!

 

राजू फुंडे, प्रतिनिधी – सालेकसा:-  तालुक्यात नगरपंचायत, पंचायत समिती, तहसील कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, कृषी कार्यालय आदी महत्त्वाची शासकीय कार्यालये कार्यरत आहेत. मात्र, या कार्यालयांमध्ये कार्यरत असलेले अनेक कर्मचारी गोंदिया, आमगाव व इतर ठिकाणांहून रोज अप-डाऊन करीत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची चर्चा तालुक्यात रंगू लागली आहे.

तालुक्याच्या दुर्गम भागातून येणारे नागरिक विविध शासकीय कामांसाठी सकाळपासून कार्यालयात हजेरी लावतात. परंतु अनेकदा संबंधित अधिकारी अथवा कर्मचारी वेळेवर उपलब्ध नसणे, कामात विलंब होणे किंवा कार्यालयीन वेळ संपण्यापूर्वीच बस व रेल्वेच्या वेळेमुळे काही कर्मचारी निघून जाण्याच्या प्रकारामुळे नागरिकांची कामे रखडत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.

विशेष म्हणजे, बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांना बस किंवा रेल्वेच्या माध्यमातून मोठा प्रवास करून सालेकसा येथे यावे लागते. दिवसभर प्रतीक्षा करूनही काम पूर्ण न झाल्यास त्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. काही नागरिकांना तर वारंवार कार्यालयाचे फेरे मारावे लागत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, तालुक्यातील महत्त्वाच्या कार्यालयांमध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेचे काटेकोर पालन करून नागरिकांची कामे वेळेत मार्गी लावावीत. तसेच वरिष्ठ प्रशासनानेही याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

सालेकसा तालुक्यातील शासकीय यंत्रणा अधिक कार्यक्षम व नागरिकाभिमुख होण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची अपेक्षा सर्वसामान्य जनतेकडून व्यक्त केली जात आहे.