पोलीस निरीक्षक भूषण बुराडे यांचा सालेकसा तालुक्यात उल्लेखनीय कार्यकाळ
राजू फुंडे | सालेकसा प्रतिनिधी
सालेकसा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भूषण बुराडे यांनी आपल्या सुमारे अडीच वर्षांच्या कार्यकाळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे. शांत, संयमी व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांनी तालुक्यात विशेष ओळख निर्माण केली.
त्यांच्या नेतृत्वाखाली सालेकसा पोलीस ठाण्याने अनेक सामाजिक उपक्रम राबविले. नागरिकांच्या तक्रारी तत्परतेने सोडविणे, जनतेशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवणे तसेच गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवणे यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाबद्दल विश्वास वाढला आहे.
दुर्गम व नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळख असलेल्या सालेकसा तालुक्यात पोलीस व नागरिक यांच्यात समन्वय निर्माण करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. युवकांना मार्गदर्शन, वाहतूक जनजागृती तसेच विविध सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन त्यांनी पोलीस विभागाची सकारात्मक प्रतिमा निर्माण केली.
त्यांच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात अनेक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार यांना त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यामुळे तालुक्यातील विविध स्तरांतून त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात येत आहे.
सालेकसा तालुक्याच्या विकासासाठी आणि शांतता राखण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान निश्चितच स्मरणीय राहील, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
