General

रानमेवा पार्क ग्राम गिरोला, ग्रामीण विकासाचा आदर्श ठरलेला निसर्गरम्य उपक्रम..!

 

राजु फुंडे (प्रतिनिधी)सालेकसा : ग्रामपंचायत गिरोला व रानमेवा पार्क समितीच्या पुढाकारातून तसेच गावकऱ्यांच्या सक्रिय सहकार्याने उभारण्यात आलेला रानमेवा पार्क आज परिसरातील आकर्षणाचे केंद्र बनला आहे. सरपंच रविता विश्वनाथ मेंढे यांच्या नेतृत्वाखाली या पार्कचा सर्वांगीण विकास सुरू असून, निसर्ग संवर्धनासह सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांनाही येथे प्राधान्य दिले जात आहे.

सुमारे १२ एकर क्षेत्रात विकसित होत असलेल्या या भव्य रानमेवा पार्कमध्ये विविध प्रकारची झाडे लावण्यात आली असून परिसर हिरवागार व नयनरम्य बनला आहे. पार्कमध्ये सुंदर तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच भाविकांसाठी श्री गणेश मंदिराचे बांधकाम सुरू असून नागरिकांच्या सुविधेसाठी सुसज्ज शौचालयाचे कामही प्रगतीपथावर आहे.

या पार्कचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे युवक-युवतींसाठी सुरू असलेले पोलीस भरती प्रशिक्षण. पोलीस निरीक्षक. भूषण बुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली येथे नियमित प्रशिक्षण दिले जात असून सुमारे २०० युवक-युवतींनी या उपक्रमात सहभाग नोंदविला आहे. ग्रामीण भागातील तरुणांना करिअरची नवी दिशा देणारा हा उपक्रम कौतुकास्पद ठरत आहे.

सकाळी व सायंकाळी परिसरातील तसेच बाहेरील अनेक नागरिक आरोग्यदायी वातावरणाचा लाभ घेण्यासाठी येथे फिरण्यासाठी येतात. त्यामुळे रानमेवा पार्क हे केवळ पर्यटनस्थळ नसून सामाजिक, सांस्कृतिक आणि आरोग्यवर्धक उपक्रमांचे केंद्र म्हणून विकसित होत आहे.

याबाबत बोलताना सरपंच. रविता विश्वनाथ मेंढे यांनी सांगितले की, “रानमेवा पार्कचा विकास हा गावाच्या सर्वांगीण प्रगतीचा भाग आहे. भविष्यात आणखी आकर्षक सुविधा निर्माण करून पार्क अधिक सुंदर व आदर्श बनविण्याचा आमचा संकल्प आहे.”

गावकऱ्यांच्या एकजुटीने आणि लोकसहभागातून साकारत असलेला रानमेवा पार्क हा ग्रामीण विकास, पर्यावरण संवर्धन आणि युवक सक्षमीकरणाचा आदर्श नमुना म्हणून ओळख निर्माण करीत आहे.