सरपंच नामधारी मात्र सरपंच पती ग्रामपंचायतीचा कारभारी, जनतेचे हात डोक्यावरी..!
गोंदिया :- ग्रामीण भागातील सामान्य जनतेला विविध कामांसाठी सरपंचाच्या दाखल्यांची गरज पडते. ते दाखले सरपंचाच्या सहीने निर्गमित होतात. पण तेच दाखले मिळवण्यासाठी जनतेला तासंतास वाटच पहावी लागत असेल तर त्याचे उपयोग तरी काय? असाच काही प्रकार जिल्ह्यातील कामठा ग्रामपंचायतीत पाहायला मिळतो.
तेथील लोकसंख्या पाच हजाराच्या जवळपास आहे. तसेच शाळा, महाविद्यालय, दवाखाने, बँक, आठवडी बाजार असे अनेक व्यवसायाचे ठिकाण असल्यामुळे तेथे हजारोंच्या नागरिकांची वर्दळ सुरूच असते. याठिकाणी जनतेने निवडून दिलेल्या महिला सरपंच ऐवजी त्यांचे पती सर्व कारभार पाहतो तसेच सर्व निर्णय सुद्धा तेच व्यक्ती घेत असल्यामुळे “सरपंच हे नामधारी व सरपंच पती ग्रामपंचायतीचा कारभारी” अशी अवस्था झाली आहे. सदर प्रकारामुळे गावातील जनता त्रस्त झाली असून त्यांना अनेक कामासाठी अनेक वेळा ग्रामपंचायतीच्या चकरा माराव्या लागतात.
या दरम्यान अनेक वेळा सरपंच पती हे आपला मोबाईल बंद करून बाहेर निघून जात असल्यामुळे अनेक कामकाजांवर निर्णय घेणे हे अधिकच गुंतागुंतीचे बनत चालले आहे. अनेक शासकीय योजनेचे प्रपत्र प्रक्रियेत लागणाऱ्या दाखल्यांसाठी होत असलेल्या विलंबामुळे तेथील नागरिक हैराण झाले आहेत. तसेच ग्रामपंचायत मध्ये झालेल्या बांधकाम किंवा इतर सोयीचे काम केलेल्या व्यक्तींचे रोजच येणे जाणे असते परंतु अपेक्षित वेळेत स्वाक्षरींच्या अभावी त्यांचे काम पूर्ण होत नसल्यामुळे शेवटी निराशाच हाती येते. होत असलेल्या या सर्व प्रकारावर प्रशासनातर्फे तात्काळ दखल घेऊन लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी आता ग्रामीण नागरिक करू लागले आहेत.
