सामाजिक

रावणवाडीतील सेवा सहकारी संस्थेच्या गोदामाचे बांधकाम तीन वर्षांपासून रखडले

अर्धवट बांधकामामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न; शेतकऱ्यांची काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी

रावणवाडी/गोंदिया :-  येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे जुने गोदाम जर्जर अवस्थेत असल्याने नवीन गोदामाच्या बांधकामाला मागील तीन वर्षांपासून सुरुवात करण्यात आली आहे. हे बांधकाम गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांच्या निधीतून करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. मात्र संबंधित कंत्राटदाराकडून कामात दिरंगाई होत असल्याने सध्या हे बांधकाम अर्धवट अवस्थेत पडून आहे.

गोदामाच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर कामाला सुरुवात झाली; मात्र तीन वर्षांचा कालावधी उलटूनही बांधकाम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे या ठिकाणी बांधकाम साहित्य व अर्धवट उभ्या असलेल्या भिंतींची अवस्था नागरिकांसाठी चिंतेचा विषय बनली आहे.

दरम्यान, कामासाठी मंजूर झालेल्या निधीपैकी बहुतांश निधी निर्गमित झाल्याची चर्चा असून, प्रत्यक्षात मात्र बांधकाम अपूर्ण असल्याने या निधीच्या वापराबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. निधीचा प्रत्यक्ष किती वापर झाला, किती काम पूर्ण झाले आणि उर्वरित काम कधीपर्यंत पूर्ण होणार, याबाबत संबंधित यंत्रणेने स्पष्टता देण्याची गरज आहे.

अर्धवट बांधकामामुळे परिसरातील नागरिकांना ये-जा करताना अडचणी निर्माण होत आहेत. तसेच उंच व अपूर्ण भिंती कमकुवत झाल्यास त्या कोसळून दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बांधकाम परिसराची सुरक्षितता सुनिश्चित करण्याची मागणीही नागरिकांकडून होत आहे.

गोदामाच्या अपूर्ण बांधकामामुळे शेतकरी आणि संस्थेच्या कामकाजावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित सेवा सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच बांधकामाशी संबंधित विभागाने याची तातडीने दखल घेऊन रखडलेले काम पुन्हा सुरू करून गोदामाचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी रावणवाडी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.