General

रावणवाडी धान्य गोदामात रात्रीही मालवाहतूक; व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

रावणवाडी/गोंदिया :-  येथील शासकीय धान्य पुरवठा गोदाम परिसरात रात्रीच्या वेळीदेखील मालवाहतूक करणारे ट्रक उभे राहत असल्याची माहिती समोर आली आहे. या वाहनांमधून अन्नधान्याची वाहतूक पहाटे सुमारे ५ वाजल्यापासून संबंधित दुकानांकडे केली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे गोदामातील मालाच्या सुरक्षिततेसह संपूर्ण वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शासनाकडून सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी उच्च दर्जाचे अन्नधान्य पुरवठा केले जाते. मात्र, रात्रीच्या वेळी गोदाम परिसरात मोठ्या प्रमाणात मालवाहतूक सुरू असल्याने या प्रक्रियेबाबत परिसरात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. रात्रीच्या वेळी गोदामातून मालाची ने-आण कोणाच्या देखरेखीखाली केली जाते, वाहनांमध्ये किती माल भरला जातो आणि तो नेमका कोणत्या दुकानासाठी रवाना होतो, याबाबत पारदर्शकता असणे आवश्यक असल्याची नागरिकांची मागणी आहे.

दरम्यान, धान्य वाहतूक करणाऱ्या जड वाहनांची नियमित तपासणी केली जाते का, त्यांच्याकडे वैध फिटनेस प्रमाणपत्र, विमा व इतर आवश्यक कागदपत्रे आहेत का, याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. काही वाहनांच्या कागदपत्रांबाबतही प्रश्न उपस्थित केले जात असल्याची चर्चा आहे. मात्र, या बाबीकडे संबंधित प्रशासनाचे पुरेसे लक्ष नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे, जड वाहनांपैकी एखाद्या वाहनाचा फिटनेस योग्य नसताना त्यातून वाहतूक केली जात असेल आणि वाहतुकीदरम्यान अपघात घडून जीवितहानी झाली, तर त्याची जबाबदारी कोणाची, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.

त्यामुळे संबंधित विभागाने गोदामातील रात्रीची मालवाहतूक, वाहनांची कागदपत्रे, फिटनेस प्रमाणपत्रे, मालाच्या वजनाची नोंद आणि वितरण प्रक्रियेची सखोल तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रशासनाने केवळ कागदोपत्री कारवाई न करता प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.