संविधान दिनानिमित्त गोंदियात ‘WALK – TALK – LIVE FOR SAMVIDHAN’ जनजागृती दिंडी
गोंदिया :- संविधान जनजागृती अभियानांतर्गत संविधानिक मूल्यांचा प्रसार व जनजागृती करण्याच्या उद्देशाने संविधान दिनानिमित्त गुरुवार, २६ नोव्हेंबर रोजी गोंदिया येथे ‘WALK – TALK – LIVE FOR SAMVIDHAN’ – संविधान मूल्यांच्या मार्गावर चला, बोला आणि संविधानिक मूल्ये आचरणात जगा! या संकल्पनेवर आधारित संविधान जनजागृती दिंडीचे आयोजन करण्यात आले.
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जन्मद्विशताब्दी वर्षाच्या तसेच महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर विविध शाळा-महाविद्यालये आणि मैत्री मल्टीपर्पज सोशल वेल्फेअर सोसायटी (रजि.), गोंदिया अंतर्गत संविधान मैत्री संघ, गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने या दिंडीचे आयोजन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा चौक, प्रशासकीय इमारत येथून संविधान उद्देशिका वाचन व बाबासाहेबांना अभिवादन करून सुरू झालेली दिंडी नेहरू चौक व गांधी प्रतिमा चौक या मार्गाने महामानवांना अभिवादन करून पुन्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा चौक येथे पोहोचून संपन्न झाली.
दिंडीमध्ये जिल्ह्यातील विविध शाळा-महाविद्यालयांचे शिक्षक, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी संविधानाची उद्देशिका, मूलभूत अधिकार, मूलभूत कर्तव्ये, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक समता व मानवी प्रतिष्ठा अशा विषयांवरील आकर्षक संविधान जागर फलक व पोस्टर्स हातात घेऊन जनजागृती केली.
विशेष म्हणजे, काही विद्यार्थ्यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या वेशभूषा साकारून त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा संदेश दिंडीच्या माध्यमातून दिला. या उपक्रमामुळे दिंडीला विशेष आकर्षक स्वरूप प्राप्त झाले.
कार्यक्रमादरम्यान संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले तसेच संविधानिक मूल्ये दैनंदिन जीवनात आचरणात आणण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी ‘भारतीय संविधानाचा विजय असो’, ‘संविधान निर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
या कार्यक्रमाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव नरेश वाळके, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त किशोर भोयर, जिल्हा बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड. सचिन बोरकर, एस. एस. गर्ल्स कॉलेजच्या प्राचार्य डॉ. शारदा महाजन आणि गुरुनानक स्कूलच्या प्राचार्य माहेरुख शेख यांची उपस्थिती होती.संविधान मैत्री संघाच्या वतीने सी. पी. बिसेन, वसंत गवळी, शीतल बोरकर, दिलीप गौतम, आशिष चौहान, आदेश गणवीर, हंसा बावनकर, पद्मा उके, कुंदा चंद्रिकापूरे, वंदना तुरकर, रोहित सतदेवे आदींनी सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. दिशा गेडाम यांनी केले, तर आभार प्रदर्शन संविधान मैत्री संघाचे संयोजक अतुल सतदेवे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी एस. एस. गर्ल्स कॉलेजच्या वतीने प्रा. डॉ. ईश्वरी खटवाणी, प्रा. संदीप राहुल, प्रा. लालाजी सपाटे, प्रा. चिन्मय दुरुगकर, प्रा. धुवारे, प्रा. शेंडे, प्रा. पुरुषोत्तम वासनिक, राष्ट्रीय सेवा योजना (NSS), श्री गुरुनानक स्कूल प्रशासन, संविधान मैत्री संघ, एम. जी. पॅरामेडिकल, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय यांनी सहकार्य केले.
दिंडीमध्ये शिस्तबद्ध, कल्पक व प्रभावी सहभाग नोंदविणाऱ्या शाळांचा विशेष गौरव करून त्यांना प्रोत्साहन पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले. संविधानाची उद्देशिका, मूलभूत अधिकार व कर्तव्ये तसेच न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांविषयी नागरिक, विद्यार्थी व युवकांमध्ये जनजागृती निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
