आगीत संसार उद्ध्वस्त झालेल्या शेतकरी कुटुंबाला लायन्स क्लबचा मदतीचा हात
लायन्स क्लब इंटरनॅशनल व स्वाभिमान माजी सैनिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम; २५ हजारांची आर्थिक मदत आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
भंडारा /तुमसर :- सामाजिक बांधिलकी जपत संकटग्रस्तांना मदतीचा हात देण्याचा स्तुत्य उपक्रम लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 H1, रिजन 5 आणि स्वाभिमान माजी सैनिक बहुउद्देशीय संस्था, तुमसर यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला. तुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरातील धानेगाव येथील आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकरी किसनलाल तुरकर यांचे घर आगीत जळून खाक झाल्याने त्यांच्यावर ओढवलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कुटुंबाला २५ हजार रुपयांची रोख आर्थिक मदत, कपडे व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजना, गोंदिया जिल्ह्यानेही सहकार्य केले.
दि. ९ ऑक्टोबर रोजी किसनलाल तुरकर यांच्या राहत्या घराला अचानक आग लागली. या भीषण आगीत घरातील धान्य, कपडे, जीवनावश्यक साहित्य तसेच जनावरांसाठी साठवून ठेवलेला चारा जळून खाक झाला. या दुर्घटनेमुळे तुरकर कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून दहा सदस्यांच्या कुटुंबावर उघड्यावर येण्याची वेळ आली.
या घटनेची माहिती मिळताच लायन्स क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर विलास साखरे, रिजन चेअरपर्सन अँड . दीपक रावलानी, माजी सैनिक व लायन सदस्य चंदू कांबळे, झोन चेअरपर्सन प्रा. डॉ. बबन मेश्राम तसेच पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर भरत भलगट यांनी पुढाकार घेतला. तुमसर व भंडारा येथील लायन्स क्लब परिवाराच्या सहकार्याने पीडित कुटुंबाला आर्थिक मदतीसह कपडे व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
यावेळी सरपंच धनराज उईके, रिजन चेअरपर्सन लायन दीपक रावलानी, राष्ट्रीय सेवा योजना गोंदिया जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. बबन मेश्राम, लायन्स क्लब भंडारा ब्राससिटीच्या सचिव तथा सुलभा शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष डॉ. सुलभा मेश्राम, लायन्स क्लबच्या अध्यक्षा श्रीमती रावलानी, चंदू कांबळे, राजकुमार खंडेलवाल, नंदू सोनकर, अमरीश जैस्वाल, दिनेश पिकालमुंडे, दिनेश लांजेवार, रोशन मेश्राम, पटले सर, अर्जुन चौधरी आदी उपस्थित होते.
तसेच स्वाभिमान माजी सैनिक बहुउद्देशीय संस्था, तुमसरचे प्रसन्नकुमार सरकार, चंदू कांबळे, दीनदयाल रहांगडाले, निकेश पटले, राजकुमार टेभरे, भैयालाल तुरकर, पोलीस पाटील गजभिये, ग्रामपंचायत सदस्य, लायन्स क्लबचे पदाधिकारी व सदस्य आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संकटाच्या काळात समाजातील दानशूर व्यक्ती व सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन गरजू कुटुंबांना आधार देणे हीच खरी सामाजिक बांधिलकी असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले.
