General

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला..! महिला गंभीर जखमी

बोंडगाव सुरबन जंगल परिसरातील घटना; परिसरात दहशतीचे वातावरण

 

अर्जुनी मोरगाव :-तालुक्यातील बोंडगाव सुरबन जंगल परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या एका महिलेवर वाघाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना दिनांक ९ रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर ग्रामीण रुग्णालय मोरगाव अर्जुनी येथे उपचार सुरू आहेत. घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बोंडगाव सुरबन येथील रहिवासी सुनिता चंद्रकुमार हटवार (वय ४८) या इतर काही महिलांसोबत जंगल परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी गेल्या होत्या. सकाळच्या सुमारास झुडपी जंगल परिसरात तेंदूपत्ता तोडत असताना घात लावून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे महिलांमध्ये एकच आरडाओरड सुरू झाली.

महिलांच्या आरडाओरडीनंतर वाघ जंगलाच्या दिशेने पळून गेला. दरम्यान, जखमी सुनिता हटवार यांना तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय मोरगाव अर्जुनी येथे दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली. वन अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी करून गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला. नागरिकांनी एकटे जंगल परिसरात जाऊ नये तसेच वन्यप्राण्यांचा वाढता वावर लक्षात घेता काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सध्या जंगल परिसरात वाघासह इतर वन्यप्राण्यांची हालचाल वाढल्याने अशा घटना पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे वनविभागाने सांगितले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाने गस्त वाढवून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे।