Monday, June 1, 2026
Latest:
राजकीय

भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीचे अविनाश ब्राम्हणकर यांचा उमेदवारी दाखल, खा. प्रफुल्ल पटेल यांची उपस्थिती परिणय फुके,शिंदेसेनेचे आमदार भोंडेकर अनुपस्थित, फुके -भोंडेकर वादाच्या पुन्हा चर्चा

 

भंडारा :-  भंडारा आणि गोंदिया विधानपरिषद निवडणुकीचा नामनिर्देशन फॉर्म भरण्याचा आज (सोमवारी, ता १) शेवटचा दिवशी महायुतीकडून भाजपचे अविनाश ब्राम्हणकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

यावेळी खा. प्रफुल पटेल, आ. परिणय फुके,अर्जुनी मोरगाव विधानसभेचे आमदार राजकुमार बडोले, आ. राजूभाऊ कारेमोरे, आ. विनोद अग्रवाल, आ. संजय पुराम, आ. विजय रहांगडाले, माजी खासदार सुनील मेंढे, सुनील फुंडे, राजेंद्र जैन उपस्थित होते. अविनाश ब्राम्हणकर यांचं उमेदवारी अर्ज दाखल कारण्याअगोदर भंडारा येथील लक्समी सभागृहात जाहीर सभा घेण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढून महायुती उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी शेकडो महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र यावेळी शिंदे सेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर उपस्थित नसल्याने अनेकांच्या भुवया उंचाविल्या होत्या.कारण मागील नगर परिषद निवडणुकीत आ. परिणय फुके आणि आ. नरेंद्र भोंडेकर यांनी एकमेकांना एकदम खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्या होत्या. त्यामुळे महायुतीत भंडारा जिल्ह्यात बिघाडी तर झाली नाहीं ना अशा चर्चा आत्ता रंगू लागल्या आहेत.

 

भंडारा आणि गोंदिया या दोन्ही जिल्ह्यांतील जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर परिषद आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यसंख्या लक्षात घेता ही निवडणूक महायुतीसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. भाजपसाठी ही जागा जिंकणे म्हणजे विदर्भातील आपली संघटनात्मक ताकद पुन्हा एकदा अधोरेखित करण्याची संधी ठरणार आहे.या मतदारसंघात ४५७ मतदार असून महाविकास आघाडीपेक्षा जवळपास १०० मतदार भाजप महायुतीकडे अधिक असल्याने निवडणुकीचा निकाल महायुतीच्या पारड्यातच स्पष्ट दिसून येत आहे.

राजकीय जाणकारांच्या मते, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या जागेचा निकाल केवळ एक विधानपरिषद सदस्य निवडण्यापुरता मर्यादित राहणार नाही. तो भविष्यातील राजकीय दिशा आणि जनाधाराचे संकेत देणारा ठरू शकतो. त्यामुळेच प्रत्येक निर्णय अत्यंत मोजून-मापून घेतला जात असल्याचे दिसून येत आहे.