Monday, June 1, 2026
Latest:
राजकीय

भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीचे अविनाश ब्राम्हणकर यांना उमेदवारी, आज दाखल करणार अर्ज 

 

गोंदिया: – भंडारा आणि गोंदिया विधानपरिषद निवडणुकीचा नामनिर्देशन फॉर्म भरण्याचा आज (सोमवारी, ता १) शेवटचा दिवस आहे. महायुतीकडून भाजप लढणार असून २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत नाना पटोले यांच्याकडून अल्प मताने पराभूत झालेले अविनाश ब्राम्हणकर यांना महायुतीने उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीच्यावतीने काँग्रेस लढणार असून काँग्रेसकडून गोंदियाचे प्रफुल्ल अग्रवाल यांचे नाव निश्चित झाले आहे.अग्रवाल हे महाविकास आघाडीसह अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.अविनाश ब्राम्हणकर हे माजी मंत्री डाॅ.परिणय फुके यांच्या मर्जीतील उमेदवार असल्याची चर्चा आहे.

भंडारा आणि गोंदिया या दोन्ही जिल्ह्यांतील जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर परिषद आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यसंख्या लक्षात घेता ही निवडणूक महायुतीसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. भाजपसाठी ही जागा जिंकणे म्हणजे विदर्भातील आपली संघटनात्मक ताकद पुन्हा एकदा अधोरेखित करण्याची संधी ठरणार आहे.या मतदारसंघात ४५७ मतदार असून महाविकास आघाडीपेक्षा जवळपास १०० मतदार भाजप महायुतीकडे अधिक असल्याने निवडणुकीचा निकाल महायुतीच्या पारड्यातच स्पष्ट दिसून येत आहे.

राजकीय जाणकारांच्या मते, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या जागेचा निकाल केवळ एक विधानपरिषद सदस्य निवडण्यापुरता मर्यादित राहणार नाही. तो भविष्यातील राजकीय दिशा आणि जनाधाराचे संकेत देणारा ठरू शकतो. त्यामुळेच प्रत्येक निर्णय अत्यंत मोजून-मापून घेतला जात असल्याचे दिसून येत आहे. आज महायुतीच्या नेते मंडळीसह अविनाश ब्राम्हणकर हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.