General

संकटाच्या काळात आधारवड ठरले आमदार नाना पटोले; आगीत उद्ध्वस्त झालेल्या कुंभरे कुटुंबाला दिलासा!

अमित रणदिवे /भंडारा:- भंडारा जिल्ह्यातील, लाखांदूर तालुक्यातील पाले पेंढरी येथे दोन दिवसांपूर्वी लागलेल्या एका भीषण आगीत एका गरीब कुटुंबाचा संपूर्ण संसार अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे. या आगीत घरातील जीवनावश्यक वस्तू आणि संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले असून, कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, परंतु कुटुंबाचे अतोनात नुकसान झाले आहे.

आमदार नाना पटोलेंकडून तात्काळ मदत

या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना पटोले यांनी तात्काळ दखल घेतली. त्यांनी पीडित कुटुंबाला धीर देत मदतीचा हात पुढे केला आहे. आमदार पटोले यांच्या वतीने आग्रस्त कुटुंबाला तातडीने जीवनावश्यक वस्तू आणि संसारोपयोगी साहित्य भेटवस्तू स्वरूपात प्रदान करून एक मोठा आधार देण्यात आला.

कुटुंबाची परिस्थिती हलाकीची

आगीत घर गमावलेल्या व्यक्तीचे नाव परमेश्वर ज्ञानेश्वर कुंभरे असे आहे , कुंभरे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाकीची आहे. घर जळाल्यामुळे सध्या हे कुटुंब गावातील सेवा सहकारी संस्थेच्या इमारतीमध्ये तात्पुरत्या स्वरूपात वास्तव्यास आहेत.

मदत वाटप प्रसंगी मान्यवरांची उपस्थिती

आमदार नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली जीवनोपयोगी साहित्याचे वाटप करताना काँग्रेस कमिटीचे जिल्हा महासचिव उत्तम भागडकर, सरपंच संतोष शिवनकर, उपसरपंच यशपाल मेश्राम, माजी उपसरपंच भोजराज नान्हे , सोमेश्वर मंगळ यांसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी गावकऱ्यांनीही आग्रस्त कुटुंबाला शक्य ती मदत करण्याचे आवाहन केले असून, शासनाकडून या कुटुंबाला लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी केली जात आहे.