General

संत कबीर कैवल्य आश्रम किडगीपार येथे उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचा उत्साहात समारोप

 

गोंदिया, प्रतिनिधी : संत कबीर कैवल्य आश्रम, किडगीपार येथे दिनांक 1 जून ते 10 जून दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचा उत्साहपूर्ण वातावरणात समारोप करण्यात आला. या शिबिरात एकूण 40 विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून विविध उपक्रमांचा लाभ घेतला.

शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांना स्वसंरक्षण, अध्यात्मिक शिक्षण, शैक्षणिक मार्गदर्शन तसेच कौशल्यविकासाशी संबंधित विविध प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिस्त, आत्मविश्वास, व्यक्तिमत्त्व विकास आणि जीवनमूल्यांचे महत्त्व पटवून देण्यात आले.

शिबिरातील दैनंदिन कार्यक्रम सकाळच्या नित्यक्रमाने सुरू होत असे. त्यानंतर कवायत, शारीरिक प्रशिक्षण आणि ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार विविध शैक्षणिक व प्रात्यक्षिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत होते. प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करून त्यांच्यातील कौशल्ये विकसित करण्याचा प्रयत्न केला.

शिबिराचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत अशा प्रकारच्या प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन भविष्यातही व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

समारोप कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून फोर्स वन फाउंडेशनचे अध्यक्ष अरुणभाऊ कावळे तसेच सामाजिक कार्यकर्ते नीलमभाऊ हलणारे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत जीवनात शिस्त, शिक्षण आणि सामाजिक बांधिलकी यांचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग दैनंदिन जीवनात करण्याचे आवाहन केले. या शिबिराचे मुख्य मार्गदर्शक म्हणून सिहान ईश्वर वरकडे सिंहान जनार्दन कुसराम यांनी अथक परिश्रम घेतले

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. पूजा मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपासराव सोनवणे यांनी मानले. शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक केले.

या उन्हाळी प्रशिक्षण शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, शारीरिक तंदुरुस्ती आणि सामाजिक जाणीव निर्माण होण्यास मोठी मदत झाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.