असंघटित क्षेत्र आणि रोजगार समजून घेण्यासाठी महत्त्वाची सर्वेक्षणे
भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर लोक असंघटित क्षेत्रात काम करतात. लहान उद्योग, दुकाने, सेवा देणारे लोक, तसेच स्वयंरोजगार करणारे व्यक्ती यांचा यात समावेश होतो. या क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होतो, पण हे क्षेत्र अनौपचारिक असल्यामुळे त्याची अचूक माहिती मिळवणे कठीण जाते. ही समस्या लक्षात घेऊन केंद्र शासनाच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) ‘असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण’ (ASUSE) सुरू केले आहे. महाराष्ट्रात हे सर्वेक्षण अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयामार्फत राबवले जात आहे.
या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे असंघटित बिगर-कृषी क्षेत्रातील उद्योगांची आर्थिक स्थिती आणि कामकाज समजून घेणे. यात उत्पादन, व्यापार आणि विविध सेवा क्षेत्रातील माहिती गोळा केली जाते. या माहितीमुळे शासनाला योग्य धोरणे आखता येतात आणि देशाच्या आर्थिक नियोजनाला मदत होते. या सर्वेक्षणात लहान उद्योग, दुकाने, सेवा देणारे व्यवसाय, स्वयंरोजगार करणारे लोक यांचा समावेश होतो. मात्र मोठ्या नोंदणीकृत कंपन्या, सरकारी संस्था, शेती, खाणकाम आणि बांधकाम यांसारखी काही क्षेत्रे यात समाविष्ट नाहीत.
आजच्या बदलत्या काळानुसार ‘गिग इकॉनॉमी’लाही या सर्वेक्षणात स्थान देण्यात आले आहे. जसे की स्विगी, झोमॅटो, ॲमेझॉनसाठी काम करणारे डिलिव्हरी कर्मचारी, ओला-उबर चालक तसेच ऑनलाइन कंटेंट तयार करणारे लोक यांचाही समावेश केला जात आहे.
यासोबतच ‘नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण’ (PLFS) हे देखील रोजगाराची स्थिती समजून घेण्यासाठी महत्त्वाचे आहे. या सर्वेक्षणातून देशातील किती लोक काम करतात, किती लोक बेरोजगार आहेत आणि रोजगाराचे स्वरूप काय आहे याची माहिती मिळते.
PLFS मधून श्रमशक्ती सहभाग दर (LFPR), कामगार-लोकसंख्या गुणोत्तर (WPR) आणि बेरोजगारी दर (UR) यांसारखे महत्त्वाचे निर्देशक मिळतात. यामुळे रोजगाराच्या स्थितीचा अचूक अंदाज येतो.
या सर्वेक्षणामध्ये लोकांची वैयक्तिक माहिती, शिक्षण, कौशल्ये, रोजगाराचे प्रकार, उत्पन्न आणि जीवनमान याविषयी माहिती घेतली जाते. ही माहिती शासनाला रोजगार निर्मिती, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण आणि आर्थिक विकासाच्या योजना तयार करण्यासाठी उपयोगी ठरते.
गोंदिया जिल्ह्यातही या दोन्ही सर्वेक्षणांचा शुभारंभ करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी नागरिकांना या सर्वेक्षणात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. हे सर्वेक्षण वर्षभर चालणार असून ग्रामीण आणि शहरी भागात निवडक कुटुंबांकडून माहिती गोळा केली जाणार आहे. सर्वेक्षणासाठी येणारे अधिकारी टॅबलेट किंवा लॅपटॉपच्या सहाय्याने माहिती नोंदवतील आणि नागरिकांनी दिलेली माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल.
शेवटी, ही सर्वेक्षणे केवळ माहिती गोळा करण्यासाठी नसून देश आणि जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने यात सहभागी होऊन योग्य माहिती देणे गरजेचे आहे. यामुळे भविष्यात रोजगाराच्या अधिक संधी निर्माण होऊन समाजाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो.
– जिल्हा माहिती कार्यालय, गोंदिया
00000000
