सामाजिक

जांभळी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत श्रमदानातून वनराई बंधाऱ्याची निर्मिती

जांभळी / दोडके : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत तसेच WOTR संस्थेच्या संयुक्त विद्यमाने मौजा जांभळी येथे श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्याचे काम उत्साहात पार पडले. जलसंधारण, पाणी अडवा-पाणी जिरवा आणि लोकसहभागातून ग्रामविकास साधण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमात WOTR संस्थेचे प्रोजेक्ट मॅनेजर श्री. राहुल पंचभाई, सोशल एक्सपर्ट श्री. रामचंद्र शेटे, ग्रामपंचायत दोडके-जांभळीच्या माजी सरपंच सौ. रणजिता ताई कोराम माजी उपसरपंच विजय सोनवणे यांच्यासह गावातील व बाहेरगावातील कर्मचारी, महिला आणि युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सर्वांनी एकत्रितपणे श्रमदान करून वनराई बंधाऱ्याच्या कामात योगदान दिले.

वनराई बंधाऱ्यामुळे पावसाचे पाणी अडविण्यास, जमिनीत पाणी मुरविण्यास तसेच भूजलपातळी वाढविण्यास मदत होणार आहे. अशा उपक्रमांतून जलसंधारणाबाबत जनजागृती होण्याबरोबरच गावाच्या शाश्वत विकासाला चालना मिळणार आहे.

कार्यक्रमाच्या सांगतेप्रसंगी जांभळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री. विजयकुमार सोनवने यांनी WOTR संस्थेचे पदाधिकारी, बाहेरगावाहून आलेले मान्यवर, गावातील महिला, युवक व सर्व सहभागींचे आभार मानले.

लोकसहभागातून जलसंधारण आणि ग्रामविकासाचा आदर्श निर्माण करणारा हा उपक्रम जांभळी येथे उत्साहात पार पडला.