अपघात

कर्तव्यावर असताना अस्वलाचा हल्ला; न्यू नागझिरा अभयारण्यात वनरक्षकाच् दुर्दैवी मृत्यू

तिरोडा: – न्यू नागझिरा वन्यजीव अभयारण्यातील उमरझरी गेट येथे कर्तव्य बजावत असताना झालेल्या अस्वलाच्या अचानक हल्ल्यात वनपाल शामू शरणागत यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे वन विभागात शोककळा पसरली असून संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वनरक्षक शामू शरणागत हे नेहमीप्रमाणे उमरझरी परिसरातील आसोली बीट येथे एका कर्मचाऱ्यांसोबत आपल्या नियमित कर्तव्यावर होते. याचवेळी जंगलातून अचानक आलेल्या अस्वलाने त्यांच्यावर हल्ला चढवला. हा हल्ला इतका भीषण होता की त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी व बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या घटनेचा पुढील तपास वन विभागाकडून सुरू आहे.

कर्तव्य बजावत असताना एका वन कर्मचाऱ्याला जीव गमवावा लागल्याने वन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. वन्यजीवांचे संरक्षण करताना स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वनक्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांना आवश्यक सुरक्षा साधने, आधुनिक बचाव साहित्य आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज या घटनेतून अधोरेखित झाली आहे.

दरम्यान, गोंदिया जिल्ह्यात मानव-वन्यप्राणी संघर्षाच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी तिरोडा तालुक्यातील बीबीटोला परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याआधीही विविध भागांत बिबट्या, अस्वल व इतर वन्यप्राण्यांच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आता वनरक्षकाच्या मृत्यूने ही चिंता अधिकच गडद झाली आहे.

वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवास कमी होणे, जंगलालगत मानवी वस्तीचा विस्तार आणि जंगलातील वाढती मानवी हालचाल ही मानव-वन्यप्राणी संघर्षाची प्रमुख कारणे मानली जात आहेत. त्यामुळे अशा संवेदनशील भागात गस्त वाढविणे, वन कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक सुरक्षा साधने उपलब्ध करून देणे तसेच स्थानिक नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या वनरक्षक शामू शरणागत यांच्या निधनामुळे वन विभागासह संपूर्ण जिल्ह्यात शोक व्यक्त करण्यात येत असून, त्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून तातडीची मदत व योग्य भरपाई देण्याची मागणीही पुढे येत आहे.