अपघात

एसआयआर कामासाठी जात असताना शिक्षिकेच्या दुचाकीला रानडुकराची धडक; गंभीर जखमी, शिक्षकांमध्ये चिंता

गोंदिया : शाळेतील नियमित अध्यापनासोबतच एसआयआर (Special Intensive Revision) चे काम पार पाडण्यासाठी जात असताना एका शिक्षिकेच्या दुचाकीला रानडुकराने धडक दिल्याने गंभीर अपघात झाल्याची घटना 11 जुलै रोजी पांढराबोडी गावाजवळील मुख्य रस्त्यावर घडली. या अपघातात शिक्षिका प्रिया अजय डोंगरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षिका प्रिया डोंगरे या एसआयआरच्या कामानिमित्त दुचाकीने प्रवास करत असताना अचानक रस्त्यावर आलेल्या जंगली रानडुकराने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे त्या रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाल्या. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने गोंदिया येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने पुढील उपचारासाठी त्यांना नागपूर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.

या घटनेनंतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या नियमित शालेय कामकाजासोबतच एसआयआरची जबाबदारीही पार पाडावी लागत असल्याने अनेकांना कमी वेळेत विविध ठिकाणी प्रवास करावा लागत आहे. वेळेचे नियोजन करताना होणारी धावपळ, वाढलेला कामाचा ताण आणि सततचा प्रवास यामुळे अपघाताचा धोका वाढत असल्याची भावना शिक्षकांमध्ये व्यक्त होत आहे.

शिक्षक संघटनांनी अशा स्वरूपाच्या अतिरिक्त कामांसाठी सुरक्षित नियोजन, पुरेसा वेळ आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. संबंधित शिक्षिकेच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना शिक्षण क्षेत्रातील सहकारी आणि नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने शिक्षकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही पुढे येत आहे