वाढदिवसाच्या पार्टीतून वाद; कॉलर पकडल्याचा राग, तरुणाची धारदार शस्त्राने हत्या..!
गोंदिया : शहरातील अंगूर बगीचा परिसरातील मोबे हॉस्पिटलजवळ असलेल्या एकदंत कॉलनी येथे 28 ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास क्षुल्लक वादातून एका 32 वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी एका संशयित आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103(1) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृतक मिथून भैयालाल ठाकरे (वय 32, रा. नवा टोला, नागरा) हा आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करून 28 ऑगस्टच्या रात्री दारूच्या नशेत अंगूर बगीचा परिसरातील एकदंत कॉलनी येथे गेला होता. त्यावेळी त्याचा आरोपी संदीप देवदास मेश्राम (रा. कटांगी टोला) याच्याशी वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे.
रात्री सुमारे 1 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास मिथून ठाकरे हा आरोपीच्या घरी गेला. यावेळी त्याने आरोपीची कॉलर पकडून धक्काबुक्की केल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे. या घटनेनंतर दोघांमध्ये वाद वाढला.
मिळालेल्या माहितीनुसार, झालेल्या धक्काबुक्कीचा राग मनात धरून आरोपी संदीप मेश्राम याने धारदार शस्त्राचा वापर करून मिथून ठाकरे याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात मिथून ठाकरे याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती रामनगर पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन पुढील वैद्यकीय प्रक्रियेसाठी पाठविण्यात आला असून, घटनेचा सविस्तर तपास सुरू आहे.
या प्रकरणी रामनगर पोलिसांनी BNS कलम 103(1) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
दरम्यान, वाढदिवसाच्या कार्यक्रमानंतर झालेल्या वादाचे रूपांतर थेट हत्येत झाल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे. पोलिसांकडून घटनेमागील नेमके कारण, हल्ल्यात वापरण्यात आलेले शस्त्र तसेच इतर बाबींचा तपास केला जात आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर घटनेबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
