General

केसलवाडा फाटा रस्त्याची दुरवस्था; खड्ड्यांमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला!

तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्या निवासस्थानासह शाळा-महाविद्यालयांकडे जाणारा प्रमुख मार्ग दुर्लक्षित

प्रतिनिधी /केसलवाडा फाटा :-  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील केसलवाडा फाटा ते परिसरातील गावांना जोडणाऱ्या प्रमुख रस्त्याची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे, उखडलेला डांबराचा थर आणि खराब झालेल्या रस्त्यामुळे वाहनचालकांसह विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर, कामगार व नोकरदार वर्गाला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

विशेष म्हणजे, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या निवासस्थानाकडे जाणारा मार्ग, तसेच MDN इंग्लिश स्कूल, लिटल फ्लॉवर स्कूल आणि सैनिकी विद्यालयाकडे जाणारा रस्ता याच मार्गावरून जातो. त्यामुळे या रस्त्यावर दररोज मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व नागरिकांची ये-जा असते.

गराडा, केसलवाडा, माडगी, टेकेपार यासह अनेक गावांच्या दळणवळणासाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. एसटी बस, जड वाहतूक, शेतमालाची वाहतूक करणारी वाहने तसेच दुचाकी व चारचाकी वाहनांची सतत वर्दळ असतानाही रस्त्याच्या दुरुस्तीकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

खड्ड्यांमुळे विशेषतः दुचाकीस्वार आणि विद्यार्थ्यांना धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांची खोली लक्षात येत नसल्याने अपघाताची शक्यता अधिक वाढते. रात्रीच्या वेळी परिस्थिती आणखी गंभीर बनते.

‘रस्ता की खड्ड्यांचे साम्राज्य?’

एकीकडे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची निवासस्थाने आणि महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था याच मार्गावर आहेत, तर दुसरीकडे हजारो नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीचा हा प्रमुख मार्ग आहे. तरीही रस्त्याची अशी अवस्था का? अपघात झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

तातडीने दुरुस्तीची मागणी

केसलवाडा फाटा मार्गाची तातडीने पाहणी करून खड्डे बुजविणे, रस्त्याचे मजबुतीकरण करणे आणि आवश्यक त्या ठिकाणी डांबरीकरण करावे. तसेच विद्यार्थ्यांची व नागरिकांची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी परिसरातील नागरिक, विद्यार्थी, शेतकरी व वाहनचालकांकडून होत आहे.

रस्ता दुरुस्तीची जबाबदारी नेमकी कोणाची? आणि प्रशासन आणखी किती दिवस नागरिकांच्या जीवाशी खेळणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकप्रतिनिधी व प्रशसनाचे दुर्लक्ष पणामुळे जनतेला वेतीस धरले जतात दोन दिवसात दुरुस्त करावे अन्यथा भर रस्तावर बेशरमचे झाडें लावून अंदोलन करू अशी मागणी दिनेसभाऊ वासनिक अध्यक्ष जनकलल्यान अन्याय निवारण समिती  जिल्हा भंडारा यांनी केली आहे.