शिक्षकांच्या दुर्लक्षामुळे निष्पाप स्वातीचा जीव गेला?
– सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बनगाव येथील घटना
आमगाव/ गोंदिया :- आमगाव तालुक्यातील सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बनगाव येथे शिकणारी मृतक स्वाती नरेश खैरे ला दिनांक 22 ऑक्टोबर रोजी ग्रामीण रुग्णालय आमगाव येथे आणण्यात आले तेव्हा ती ब्रॉड डेड होती असे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रारंभिक तपासणी केल्यानंतर कोणतेही उपचार करता आले नाही. असे घटनेच्या वेळी कार्यरत अधिकारी डॉक्टर चौरागडे यांनी सांगितले. प्रकृती खालावल्यानंतर शाळेतूनच मृतकास दाखल करण्यात आले असते तर मृतकाचे जीव वाचवण्यात यश आले असते असे ते म्हणाले.
तत्पूर्वी आमगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वेद प्रकाश चौरागडे यांच्याशी भेट घेऊन घटनेची माहिती घेतली असता काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमच्या पथकाने सदर शाळेस भेट दिली होती तेव्हा तेथील मुख्याध्यापकांनी ती भेट नाकारली त्यामुळे मृतकाचा अहवाल हा संबंधित पथकाकडे येऊ शकला नाही. याविषयी मिळालेल्या माहितीनुसार सदर मृतक ही काही दिवसापासून नवरात्रीनिमित्त उपवास ठेवला होता त्यावरून तिची तब्येत खालावली व शाळेतच तब्येत बिघडली. तरी देखील तेथील मुख्याध्यापक व वर्ग शिक्षकांनी सदर घटनेचे गांभीर्य न ओळखता मृतक स्वातीला घरी पाठवले तेथे वेळेवर तिचे आई-वडील उपस्थित नसल्यामुळे आजी आजोबांनी फारसे लक्ष दिले नसल्याचे बाब पुढे आली आहे. जेव्हा तब्येत अधिकच खालावली तेव्हा खूप उशीर झाला होता व परिस्थिती हाताबाहेर गेली होती.
या घटनेच्या अधिक माहितीसाठी उपशिक्षणाधिकारी राहुल जगताप यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क केला असता या घटनेची माहिती केंद्रप्रमुखांना विचारून कळवतो असे म्हणाले पुढे प्रयत्न केल्यानंतरही याविषयी त्यांचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी आपल्या शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्य विषयी किती गंभीर आहेत याबाबत नक्कीच एक संदेश म्हणून लक्षात ठेवू शकतो. ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षण घेत असणाऱ्या पाल्यांच्या पालकांनी नक्कीच या घटनेवरून बोध घेणे अत्यावश्यक आहे. शाळेतील कार्यरत कर्मचारी वर्गांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे निष्पाप स्वातीला आपला जीव गमवावा लागला यावरून हे लक्षात येते की, एका किशोरवयीन मुलीसाठी कुटुंबात आईची उपस्थिती असणे किती महत्त्वाचे आहे. या घटनेवरून प्रशासकीय यंत्रणा काही बोध घेणार का याकडे आता जनसामान्यचे लक्ष लागले आहे.
