सामाजिक

गोंदिया येथे तीन दिवसीय ध्यान व धम्मप्रशिक्षण निवासी शिबीर संपन्न

गोंदिया :- त्रिरत्न बौद्ध महासंघ, जिल्हा गोंदिया अंतर्गत त्रिरत्न बुद्धिस्ट फाऊंडेशन, देवरीच्या वतीने दि. ७/११/२६ ते दि. ११/११/२६ दरम्यान, संथागार, बुद्धिस्ट समाज संघ, मरारटोली, गोंदिया येथे ध्यान व धम्म प्रशिक्षण निवासी शिबीराचे सुंदर व यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये गोंदिया जिल्ह्याच्या विविध गावांमधून तसेच नागपूरमधून अनेक बौद्ध बंधू आणि भगिनी, बालके व युवक-युवतींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. एकूण ९० शिबिरार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला.

‘​डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती’ या विषयावर त्रिरत्न बौद्ध महासंघ , नागपूर येथील धम्मचारिणी सुमेघा यांनी तिन्ही दिवस उद्बोधक धम्मप्रवचने दिली आणि शिबिराचे नेतृत्व केले.धम्मप्रवचनानंतर विविध गटांमधून संबंधित विषयावर चर्चा घडवून आणण्यात आल्या. धम्मचारिणी क्षांतिगीता यांनी धम्माचारिणी सुमेघा यांचा परिचय करून दिला आणि गटचर्चेचे नेतृत्व केले.

​ जन्माने कोणीही बौद्ध होत नसून, एखादी व्यक्ती बुद्ध, धम्म आणि संघ या तीन रत्नांना शरणगमन करून म्हणजेच प्रतिज्ञाबद्ध होऊन व शीलांचे आचरण करून आणि रितसर दीक्षा ग्रहण करूनच बौद्ध बनत असते. शरणगमनाचा अर्थ परावलंबित्व किंवा लाचारी नसून, तीन रत्नांच्या प्रति प्रतिज्ञाबद्धता आणि आपल्या जीवनाच्या केंद्रस्थानी तीन रत्नांना ठेवून निरंतर शीलांचे आचरण करणे असा आहे. अशीच व्यक्ती बौद्ध धम्मामध्ये दीक्षा ग्रहण करीत असते. बावीस प्रतिज्ञांचे पालन करीत असते आणि निरंतर धम्माचे आचरण करीत असते. भारतामध्ये बौद्ध धम्माच्या उत्थानासाठी मनुष्यबळ, द्रव्यबळ आणि मानसिक बळ आवश्यक आहे.

​माणसाला शरीरासोबत मनही आहे. शरीर जसे सुदृढ असले पाहिजे तसेच मन सुद्धा निरोगी आणि उत्साही असले पाहिजे. उत्साह निर्माण करण्याचे मूळ मनात असते. माणूस जर धम्माचे आचरण करण्यासाठी उत्साही नसेल आणि जागृत नसेल तर तो जिवंत असून मेल्याप्रमाणेच आहे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे म्हणणे होते .असे उद्बोधनात सांगण्यात आले. चातुर्वर्ण व्यवस्था विषमतावादी , माणसाला निरुत्साही करणारी आणि मनुष्याच्या उत्कर्षासाठी हानिकारक आहे.

​भ.बुद्धांचा धम्म हा शील आणि सदाचारावर तसेच विवेक आणि तर्कबुद्धीवर आधारित आहे. म्हणूनच समाजाचे नियमन करण्याचे सामर्थ्य बौद्ध धम्मामध्ये आहे. बौद्ध धम्म स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तीन तत्त्वांचा पुरस्कार करणारा आहे. जुन्या जगापेक्षा आजच्या नव्या जगाला धम्माची अधिक गरज आहे. बौद्ध धम्म मृत्यूनंतर स्वर्गाचे आमिष दाखविण्यापेक्षा याच जन्मात मुक्ती मिळवून देण्याचा आत्मविश्वास देतो आणि मार्गदर्शन करतो. त्रिरत्न बौद्ध महासंघाचे संस्थापक पूज्य भंते उर्ग्येन संघरक्षित यांनी बाबासाहेबांच्या धम्मक्रांतिचा वारसा व धम्मक्रांतीची चळवळ पुढे नेली आणि आजही भारतासहित एकूण ४५ देशांमध्ये ही चळवळ प्रभावीपणे कार्यरत आहे. हाच वारसा पुढे नेणे ही आपली जबाबदारी आहे. असे प्रेरणादायी मार्गदर्शन धम्मचारिणी सुमेघा यांनी केले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धम्मदृष्टी समजावून सांगितली.

धम्मचारी श्रमणमित्र सुद्धा नागपूरवरून विशेषत्वाने उपस्थित होते. दुपारच्या सत्रामध्ये त्यांनी युवकांना उद्बोधक असे मार्गदर्शन केले आणि युवकांच्या मनात नवा उत्साह निर्माण केला. सकाळी आणि सायंकाळच्या सत्रामध्ये त्यांनी अनापानसती आणि मैत्री भावना या मूलभूत ध्यान सरावावर मार्गदर्शन केले आणि ध्यान सराव करवून घेतला. प्रभावी ध्यान सरावाने अनेक शिबीरार्थि लाभान्वित झालेत. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीने त्यांनी शिबिरातील युवकांची मने जिंकून घेतली.

सायंकाळच्या सत्रामध्ये धम्मचारी अमोघकुमार, ध. निर्मलज्ञान आणि ध.अनोमकुमार यांनी उद्बोधक प्रवचने दिलीत ; ज्यामध्ये धम्मक्रांतीचा वारसा भ. बुद्धांपासून आपल्यापर्यंत कसा आला याचे विवेचन करून तो वारसा पुढे नेण्याचे त्यांनी मार्गदर्शन केले. धम्मचारी अश्वघोष यांनी पूजेचे नेतृत्व केले.

शिबिराच्या समारोप प्रसंगी शिबिरार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सांगितले की, “आम्ही नियमितपणे ध्यान सराव करू, भ. बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे नियमित वाचन करू आणि पुन्हा अशा धम्म शिबिरांमध्ये आम्ही सहभागी होऊ.”

शिबीरातील बालकांसाठी चित्रकला व निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले व बक्षिस वितरण करण्यात आले. ​त्रिरत्न बुद्धिस्ट फाउंडेशन देवरीचे संपूर्ण धम्मचारी आणि धम्ममित्रांनी या शिबिराच्या आयोजनासाठी परिश्रम घेतले.