General

नवेगाव बांध येथील भीषण अपघातात बहिण भावाचा मृत्यू..!

अर्जुनी मोरगाव :- तालुक्यातील नवेगाव येथे झालेल्या भीषण अपघातात देवरी शहरातील बहिण भावाच्या दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. 11 ) रोजी सायंकाळी साडेसहा वाजे दरम्यान घडली. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. अंकुर शहारे वय पंधरा वर्षे राहणार देवरी व रितिका संजय जांभुळकर वय दहा वर्ष राहणार चारभाटा बोरगाव देवरी अशी मृत झालेल्या बहिण भावांची नावे आहेत. तर अरुणा अरुण शहारे वय 40 वर्षे राहणार देवरी या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तात्काळ गोंदिया येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

 

सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार देवरी शहरातील वार्ड क्रमांक १४ येथे शहारे कुटुंब वास्तव्यास होते. रितिकाही त्यांच्याच कुटुंबात राहून देवरी येथे चौथ्या वर्गात शिक्षण घेत होती.वडिलांच्या कोरोना काळातील निधनानंतर घरची जबाबदारी आई अरुणा यांच्या अंगावर होती. दरम्यान अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ग्राम बोलदे येथे नातलगाच्या लग्न समारंभासाठी ते तिघे दुचाकीने देवरीहून बोळदे येथे जात होते. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास नवेगाव बांध येथे अज्ञान वाहनाने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने ते रस्त्यावर फेकले गेले. या भीषण अपघातात अंकुर शहारे व रितिका जांभूळकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर अरुणा शहारे या गंभीर जखमी झाल्या त्यांना तात्काळ पुढील उपचारासाठी गोंदिया येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन सहकार्य केले अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळूहळू व्यक्त होत असून संबंधित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेबद्दल नवेगाव बांध पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.