General

अबब! चक्क ‘पुढारी’च बनले रस्ते बंद पाडणारे ‘अतिक्रमणदार’;अड्याळ ग्रामपंचायत कारवाईची हिंमत दाखवणार काय?

अमित रणदिवे /भंडारा;- निवडणूक काळात आणि एरवी व्यासपीठावरून सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी लढण्याचा आव आणणारे पुढारी व सामाजिक कार्यकर्ते प्रत्यक्षात स्वतःच्या स्वार्थासाठी नियम कसे पायदळी तुडवतात, याचा धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्यातील , पवनी तालुक्यातील अड्याळ येथे समोर आला आहे. एका बड्या पुढार्‍याने थेट मुख्य रस्त्यावरच आपल्या घराच्या बांधकामाचे साहित्य टाकून अख्खा रस्ताच बंद पाडला आहे. या मुजोर लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मनमानी कारभारामुळे संतप्त नागरिकांमधून, विशेषतः पालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

६ महिन्यांपासून रस्ता ब्लॉक; चिमुरड्यांचा जीव मुठीत

अड्याळ गावातील या बड्या पुढार्‍याचा मनमानी कारभार गेल्या ६ महिन्यांपासून सुरू आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक आणि शाळकरी मुलांना सुरक्षितपणे ये-जा करता यावी यासाठी ‘साइड रोड’ (सेवा रस्ता) तयार करण्यात आला आहे. मात्र, राजकीय वरदहस्त असलेल्या या पुढार्‍याने कायद्याची सर्व बंधने झुगारून या साईड रोडवरच घराचे बांधकाम साहित्य (रेती, विटा, गिट्टी) ओतले आहे.

रस्ता पूर्णपणे ब्लॉक झाल्यामुळे नागरिक आणि चिमुरड्या विद्यार्थ्यांना वेगवान वाहनांच्या सोबतीने थेट मुख्य हायवेवरून जीव मुठीत धरून पायी प्रवास करावा लागत आहे. यामुळे येथे केव्हाही मोठा अपघात होण्याची भीती वाढली आहे.

नाल्यांवर पक्की बांधकामे; व्यापाऱ्यांचीही मुजोरी

केवळ राजकीय पुढारीच नव्हे तर अड्याळ येथील काही प्रतिष्ठित गणल्या जाणाऱ्या सामाजिक पदाधिकारी ,कार्यकर्त्यांनी आणि लहान-मोठ्या व्यापाऱ्यांनीही रस्त्याशेजारील नाल्यांवर चक्क पक्के बांधकाम केले आहे. इतकेच नव्हे तर दुकानांचे स्टँड बोर्ड, दुकानाचे साहित्य आणि दुचाकी वाहने थेट रस्त्यावर पार्क केली जात आहेत. आधीच गावातील मुख्य रस्ते अरुंद आणि वर्दळीचे आहेत, त्यातच या मुजोर अतिक्रमणधारकांनी रस्ते व्यापल्यामुळे नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे.

भाजीपाला विक्रेत्यांची वर्दळीच्या रस्त्यावर ठाण

ग्रामपंचायत प्रशासनाने भाजीपाला मार्केट भरवण्यासाठी स्वतंत्र जागा निर्धारित केली आहे. मात्र, ‘गुजरी’ बाजार भरत असलेल्या नियोजित ठिकाणी न बसता काही भाजीपाला विक्रेते थेट मुख्य आणि वर्दळीच्या रस्त्यावरच दुकान थाटून बसतात. यामुळे पायी चालताना ज्येष्ठ नागरिकांची व विद्यार्थ्यांची मोठी दमछाक होत आहे.

मतपेटीच्या राजकारणामुळे ग्रामपंचायतीची डोळेझाक?

या अत्यंत गंभीर समस्येकडे अड्याळ ग्रामपंचायत प्रशासनाने पूर्णपणे डोळेझाक केली आहे. आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून ‘आपले मत खराब होऊ नये’ या भीतीने लोकप्रतिनिधींनी या पुढार्‍यांच्या आणि व्यापाऱ्यांच्या बेकायदेशीर कृत्यांकडे कानाडोळा केल्याची चर्चा गावात रंगली आहे. त्यामुळे या कर्तव्यचुकार अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

नागरिकांचा संतप्त सवाल: ‘ते’ आंदोलक आता कुठे गायब झाले?

एरवी व्यासपीठावरून ‘बोलबच्चन’गिरी करणारे आणि ज्ञानामृताचे, माणुसकीचे डोस पाजणारे सामाजिक कार्यकर्तेच आता स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांचा जीव धोक्यात घालत असल्याने गावकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. माहितीचा अधिकाराचा (RTI) हत्यार म्हणून वापर करणारे आणि निवडणुकीदरम्यान समाजसेवेच्या पडद्याआड स्वार्थकारण करणारे ‘ते’ आंदोलक आता कुठे गायब झाले? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

जिल्हा प्रशासनाने थेट हस्तक्षेप करण्याची मागणी

ग्रामपंचायत प्रशासन या मुजोर अतिक्रमणधारकांवर कठोर कारवाई करण्याची हिंमत दाखवणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, स्थानिक प्रशासनावरील अविश्वासामुळे आता या प्रकरणात थेट जिल्हा प्रशासनानेच हस्तक्षेप करावा, अशी मागणी नागरिकांकडून व प्रामुख्याने महिलांकडून केली जात आहे. जर रस्त्यावरील हे जीवघेणे अतिक्रमण तात्काळ हटवले नाही, तर प्रशासनाला संतप्त ग्रामस्थांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही गावकऱ्यांनी दिला आहे.