Thursday, July 9, 2026
आंदोलन

भंडारा-पवनीतील ३२ गावांचे पुनर्वसन तातडीने करा; आमदार नरेंद्र भोंडेकर यांची विधानसभेत आक्रमक मागणी

मुंबई:-

भंडारा आणि पवनी तालुक्यात दरवर्षी येणाऱ्या पुरामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान होत असून, येथील ३२ गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न शासनाने तातडीने मार्गी लावावा, अशी आग्रही मागणी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मुंबई येथील पावसाळी अधिवेशनात केली. अधिवसनात ‘पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन’ (Point of Information) च्या माध्यमातून हा अतिशय संवेदनशील मुद्दा उपस्थित करत त्यांनी प्रशासकीय दिरंगाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

आमदार भोंडेकर यांनी सभागृहाचे लक्ष वेधताना सांगितले की, भंडारा विधानसभा क्षेत्रातील ३२ गावांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात पुराचे पाणी शिरते. लोकांची घरे पाण्यात बुडतात आणि त्यांचे संसार उघड्यावर येतात. या गावांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी प्रशासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आले होते. त्यापैकी २२ गावांचे प्रस्ताव सध्या मंत्रालयात पोहोचले आहेत, मात्र दुर्दैवाने ते अजूनही मंजुरीच्या प्रतीक्षेत धूळ खात पडले आहेत.

मंत्र्यांच्या आश्वासनाला केराची टोपली?

गेल्या अधिवेशनातही आमदार भोंडेकर यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे हा प्रश्न लावून धरला होता. त्यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री आशिष जायस्वाल यांनी तातडीने बैठक बोलावून हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, वर्ष उलटूनही या आश्वासनावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, याकडे आमदार भोंडेकर यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

गावकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा

शासनाच्या या उदासीन कारभारामुळे पूरग्रस्त गावकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. न्याय मिळत नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी खामारी येथे आत्मदहन करण्याचा इशारा दिला असल्याची धक्कादायक माहिती आमदार भोंडेकर यांनी दिली. त्यामुळे ही परिस्थिती कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने गंभीर बनण्यापूर्वी, मंत्रालयात प्रलंबित असलेल्या २२ गावांच्या पुनर्वसनावर सरकारने युद्धपातळीवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी विनंती त्यांनी शेवटी केली.