आंदोलन

दिलेली आश्वासन पाच दिवसात पूर्ण करा.. अन्यथा मूळ गावी परतणार..!        

पुनर्वसित श्रीराम नगरवासीयांचा इशारा… जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन 

कोहमारा /गोंदिया 20 जून.:-   पुनर्वसन करताना वेळोवेळी आश्वासन देऊ नये मागील दहा-बारा वर्षांपासून आश्वासनाची पूर्तता न झाल्याने पाच दिवसात न्याय द्या अन्यथा मूळ गावी परतणार असा निर्वाणीचा इशारा पुनर्वसित श्रीराम नगर वाशी यांनी दिला असून तसे लेखी निवेदन जिल्हाधिकारी गोंदिया यांना दिले आहे.

नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प घोषित झाल्यानंतर मानव वन्यजीव संघर्ष काढण्यासाठी कोअर क्षेत्रात असलेले कवलेवाडा,काळीमाटी, झंकार गोंदी या गावांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय वन विभागाकडून घेण्यात आला व या गावांचे सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड जवळील श्रीराम नगर येथे पुनर्वसन करण्यात आले मात्र, पुनर्वसनानंतर दहा बारा वर्षानंतरही शेती, रोजगार मूलभूत सुविधा उपजीविका आणि इतर महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत.विशेष म्हणजे पुनर्वसन करतेवेळी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा देत मागील सहा महिन्यापूर्वी पुनर्वसित आपल्या मूळ गावी दाखल झाले होते. यानंतर आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालय, वन विभाग तसेच लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत तीन महिन्याच्या आत सर्व समस्या सोडविण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले होते. त्या आश्वासनाला आता सहा महिन्याचा कालावधी लोटूनही कोणतेही ठोस कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या आश्वासनावर विश्वास उडाला असून ग्रामस्थ प्तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी आता कठोर भूमिका घेतली असून पाच दिवसाच्या आत पुनर्वसनासंबंधी प्रश्नावर समाधानकारक उपायोजना न निघाल्यास संपूर्ण गाववासी आपल्या मूळ गावी परत जाऊन उदरनिर्वाहाची कामे करेल असा स्पष्ट इसारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या लेखी निवेदनातून दिला आहे.

कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी शासनाची…

पुनर्वसित श्रीराम नगरवासी मूळ गावी परतल्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडल्यास किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील असेही पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले असून आता प्रशासनाच्या भूमीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.