महाज्योतीला लोकसंख्येच्या प्रमाणात १,५०० कोटींचा निधी द्या; आमदार डॉ. परिणय फुके यांची विधान परिषदेत जोरदार मागणी
उदय चक्रधर / मुंबई
महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या लोकसंख्येचा विचार करता, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेला (महाज्योती) १,५०० कोटी रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी जोरदार मागणी भाजप आमदार डॉ. परिणय फुके यांनी आज विधान परिषदेत केली. महाज्योतीला सध्या मिळणारा निधी हा ओबीसींच्या अथांग लोकसंख्येच्या तुलनेत अत्यंत अपुरा असून, शासनाने दिलेल्या आश्वासनाची तातडीने पूर्तता करावी, असे त्यांनी सभागृहात ठामपणे सांगितले
इतर संस्थांच्या तुलनेत ओबीसींवर अन्याय?
महाज्योतीला मिळणाऱ्या निधीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करताना डॉ. फुके यांनी सभागृहात आकडेवारीसह वस्तुस्थिती मांडली. ते म्हणाले: “राज्य शासन सारथी, बार्टी आणि महाज्योती या तिन्ही संस्थांना जवळपास समान निधी वाटप करते. मात्र, ‘सारथी’ संस्था १६ टक्के मराठा समाजासाठी आणि ‘बार्टी’ १३ टक्के अनुसूचित जातीच्या कल्याणासाठी कार्यरत आहे. याउलट ‘महाज्योती’वर राज्यातील तब्बल ६० टक्के (सुमारे ७ कोटी) ओबीसी बांधवांच्या शैक्षणिक आणि कौशल्य विकासाची जबाबदारी आहे. ओबीसींमध्ये साडेतीनशेहून अधिक जातींचा समावेश असताना सर्वांना समान निधी देणे हा अन्याय आहे.”
मागील अधिवेशनात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसंख्येच्या प्रमाणात निधी देण्याचे मान्य केले होते, याकडे लक्ष वेधत शासनाने आता कोणताही विलंब न करता १,५०० कोटींचा निधी मंजूर करावा, अशी मागणी डॉ. फुके यांनी लावून धरली.
वित्त विभागाकडे प्रस्ताव प्रलंबित; मंत्री अतुल सावे यांचे उत्तर
आमदार फुके यांच्या मागणीला उत्तर देताना इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले की, महाज्योतीचा निधी १,५०० कोटी रुपयांपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविण्यात आला आहे.
अंतिम मंजुरी अद्याप मिळाली नसली तरी आतापर्यंत महाज्योतीसाठी ७२८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. निधी (कोटींमध्ये) कारणीभूत काम योजना ४९९ कोटी रु. विविध योजनांचे थेट अनुदान १ कोटी रु. कर्मचारी वेतन २२८ कोटी रु. नागपूर (प्रशासकीय इमारत व वसतिगृह) आणि नाशिक येथील वसतिगृह उभारणी
महाज्योतीची आतापर्यंतची कामगिरी
मंत्री सावे यांनी सभागृहाला माहिती दिली की, महाज्योतीमार्फत सध्या ६,९०० प्रशिक्षणार्थी आणि १४ हजार विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व उच्च शिक्षणाचे प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांनाही आर्थिक सहाय्य दिले जात आहे. या संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत:UPSC: १०० विद्यार्थी यशस्वीMPSC: ३७१ विद्यार्थी यशस्वी इतर क्षेत्रे (लष्कर, बँकिंग इ.): सुमारे २,००० विद्यार्थ्यांनी संपादन केले यश.
ओबीसी विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी सातत्यपूर्ण लढा
आमदार डॉ. परिणय फुके यांनी महाज्योतीच्या बळकटीकरणाचा आणि ओबीसी विद्यार्थ्यांच्या हक्काचा मुद्दा यापूर्वीही अनेकदा विधान परिषदेत लावून धरला आहे. ओबीसी समाजातील तरुणांना स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास आणि परदेशी शिक्षणासाठी पुरेशा संधी मिळायच्या असतील, तर महाज्योतीला भक्कम आर्थिक पाठबळ देणे गरजेचे आहे, ही आपली भूमिका त्यांनी आजही सभागृहात आक्रमकपणे मांडली.
