भीमनगर–चंद्रपूर रेल्वेमार्गावरील ROB उभारणीच्या मागणीवर आमदारांनी संयुक्त प्रशासकीय पथकासह केली पाहणी; दोन दिवसांत सर्वेक्षण अहवाल सादर करण्याचे आदेश
गोंदिया प्रतिनिधि : -नागपूर–रायपूर रेल्वेमार्ग आणि गोंदिया–चंद्रपूर रेल्वेमार्ग यांच्या दरम्यान वसलेल्या आंबेडकर वॉर्ड, सिंगलटोली, भीमनगर, कुंभारे नगर आणि चंद्रशेखर वॉर्ड येथील नागरिक गेल्या अनेक दिवसांपासून भीमनगर रेल्वे क्रॉसिंग बंद करून तेथे रेल्वेकडून उभारण्यात येणाऱ्या भूमिगत अंडरपासला विरोध करत असून, त्या ठिकाणी रेल्वे ओव्हरब्रिज (ROB) उभारण्याची मागणी करीत आहेत. या मागणीसाठी नागरिकांनी मोर्चा काढला, जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले असून घटनास्थळी बेमुदत उपोषणही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी जिल्हा प्रशासन व रेल्वे अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी आमदार विनोद अग्रवाल यांच्यासोबत नगराध्यक्ष सचिन शेंडे, नगरसेवक सुनील भालेराव, आंदोलनाचे नेतृत्व करणारे सामाजिक कार्यकर्ते अमित भालेराव, नगरसेवक पंकज यादव, सुनील भरणे, स्नेहा गडपायले, उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, तहसीलदार पठाण, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी बोरकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंता मल्लिकार्जुनराव तसेच जिल्हा प्रशासन व रेल्वे विभागातील इतर अधिकारी उपस्थित होते.
स्थानिक नागरिक, नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले की, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे प्रशासन जनतेच्या सोयी-सुविधांचा कोणताही विचार न करता मनमानी पद्धतीने काम करीत आहे. अंडरपासचे बांधकाम सुरू करून येथील नागरिकांवर अन्याय केला जात आहे. हा परिसर नागपूर–रायपूर आणि गोंदिया–चंद्रपूर या दोन रेल्वेमार्गांच्या मधोमध वसलेला असून येथे मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे. परिसरात शाळा, महाविद्यालये तसेच लघुउद्योग आहेत.
त्यांनी पुढे सांगितले की, यापूर्वी नागपूर–रायपूर रेल्वेमार्गावरील रेल्वे क्रॉसिंग बंद करून कमी उंचीचा अंडरपास देण्यात आला असून त्यामुळे मोठ्या वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. शालेय बस, आपत्कालीन रुग्णवाहिका, घरबांधणीसाठी लागणारे ट्रक, जेसीबी, बोअरवेल यंत्रणा, वीज विभागाची वाहने आदींना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून त्यांची ये-जा सध्या केवळ भीमनगर रेल्वे क्रॉसिंगवरूनच होत आहे. अशा परिस्थितीत आता चंद्रपूर रेल्वेमार्गावरही अंडरपास उभारण्यात आल्यास हजारो नागरिकांवर हा मोठा अन्याय ठरेल. नागरिकांना मूलभूत सुविधा व दळणवळणापासून वंचित ठेवण्याचा हा प्रकार असल्याने अंडरपासऐवजी रेल्वे ओव्हरब्रिजची उभारणी करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली.
आमदार विनोद अग्रवाल यांनी प्रस्तावित अंडरपासच्या जागेची पाहणी केली. तसेच रेल्वे ओव्हरब्रिज उभारण्यासाठी उपलब्ध विविध पर्यायांचा आणि जागेचा सविस्तर आढावा घेतला. या ठिकाणी तांत्रिकदृष्ट्या कोणत्या पद्धतीने ओव्हरब्रिज उभारता येईल, याची सर्वंकष तपासणी करून उपस्थित अधिकारी व अभियंत्यांच्या संयुक्त पथकाला दोन दिवसांत सर्वेक्षण अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
यावेळी आमदार विनोद अग्रवाल यांनी नागरिकांना आश्वस्त करत सांगितले की, या विषयाची गांभीर्याने दखल घेतली जाईल. सर्वेक्षण अहवाल प्राप्त झाल्यानंतर लवकरच उच्चस्तरीय बैठक घेऊन या प्रश्नावर कायमस्वरूपी आणि समाधानकारक तोडगा काढण्यात येईल.
