ग्रामीण भागात पाठ्यपुस्तक वाटपाचा गोंधळ; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
गोंदिया प्रतिनिधि:- ग्रामीण भागातील शासकीय व जिल्हा परिषद शाळांमध्ये अद्यापही विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे पूर्णपणे वाटप झाले नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. अनेक शाळांमध्ये पुस्तके पोहोचली असली तरी मराठी माध्यमाच्या शाळांना हिंदी माध्यमाची पुस्तके, तर हिंदी माध्यमाच्या शाळांना मराठी माध्यमाची पुस्तके पाठविण्यात आल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. या चुकीमुळे शिक्षकांना पुन्हा वर्गीकरण, बदल व समन्वयाचे अतिरिक्त काम करावे लागत असून त्यांचा त्रास वाढला आहे.
पुस्तके वेळेत न मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या दैनंदिन अभ्यासात अडथळे निर्माण होत आहेत. नव्या शैक्षणिक सत्राला सुरुवात होऊन बराच कालावधी उलटूनही अनेक विद्यार्थ्यांकडे आवश्यक विषयांची पुस्तके नसल्याने अध्यापनाची गती मंदावली आहे. विशेषतः ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील विद्यार्थ्यांना या परिस्थितीचा अधिक फटका बसत असल्याचे शिक्षक व पालक सांगत आहेत.
शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या कौशल्यपूर्ण व गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दर्जावरही या परिस्थितीचा परिणाम होत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. पालकांनी तातडीने योग्य माध्यमाची पुस्तके उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
