सामाजिक

वर्गमित्रांनी जपली माणुसकी; दिवंगत रविंद्र नन्नावरे यांच्या कुटुंबाला ५९५००/- रुपयांची मदत!

गोंदिया (दि. १० नोव्हेंबर) : मैत्री ही केवळ सुखाच्या क्षणांपुरती मर्यादित नसते, तर दुःखाच्या प्रसंगी मित्राच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यातच तिचे खरे मोल असते, याचा प्रत्यय बी. एड. १९९९-२००० बॅचच्या मित्रांनी घडवून आणला आहे. अल्पशा आजाराने अकाली निधन झालेल्या रविंद्र (रवी) नन्नावरे यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी त्यांच्या बी. एड.च्या मित्रांनी एकत्र येत तब्बल ५९ हजार ५०० रुपयांचा निधी गोळा करून त्यांच्या कुटुंबीयांच्या बँक खात्यात जमा केला. मित्रांनी दाखविलेल्या या माणुसकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दिवाळीचा आनंद घेण्यापूर्वीच रवी नन्नावरे (रा. शेगाव बु., ता. वरोरा, जि. चंद्रपूर) यांच्या निधनाची दुःखद बातमी त्यांच्या गडचिरोली येथील अॅड. एन. एस. गंगुवार शिक्षण महाविद्यालयातील बी. एड. (१९९९-२०००) बॅचच्या सहकाऱ्यांना समजली. या बातमीने सर्व मित्रांना मोठा धक्का बसला. त्यातच रवी यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आणि त्यांच्या मागील काही वर्षांतील संघर्षाची माहिती समोर आल्यानंतर मित्रांनी त्यांच्या कुटुंबाला मदत करण्याचा निर्णय घेतला.

रविंद्र नन्नावरे हे मागील सुमारे २० वर्षांपासून समग्र शिक्षा अभियानांतर्गत साधनव्यक्ती या पदावर कंत्राटी स्वरूपात कार्यरत होते. मात्र, काही अपरिहार्य कारणांमुळे मागील वर्षापासून त्यांना कंत्राटी नियुक्तीचे आदेश मिळाले नव्हते. सततच्या बदल्या आणि रोजगारातील अनिश्चिततेमुळे ते मानसिक तणावातून जात होते. शासनाने समग्र शिक्षा अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदांवर कायमस्वरूपी सामावून घेण्याचा निर्णय घेतला असताना, नियुक्ती आदेश नसल्यामुळे आपण या प्रक्रियेतून वगळले जाऊ, अशी भीती त्यांना सतावत होती.

वृद्ध आई-वडील, पत्नी आणि दोन लहान मुलांच्या उदरनिर्वाहाची चिंता त्यांना सतत भेडसावत होती. याच मानसिक तणावाच्या काळात त्यांची प्रकृती खालावली. उपचारासाठी प्रथम चंद्रपूर आणि त्यानंतर नागपूर येथे हलवित असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या या अकाली निधनाने नन्नावरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

ही परिस्थिती समजताच बी. एड.च्या वर्गमित्रांनी व्हॉट्सॲप समूहावर चर्चा करून रवी यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला बॅचमधील मित्रपरिवार व सहकाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ‘फुल ना फुलाची पाकळी’ या भावनेतून प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान दिले आणि अवघ्या प्रयत्नांतून ५९ हजार ५०० रुपयांचा निधी उभा राहिला. ही रक्कम रवी यांच्या कुटुंबीयांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आली व त्याची पोच घेऊन एक मित्र आनंद भिमटे यांनी भिसी गावातील काही मान्यवर लोकांसह आज (१३) ला रवीच्या कुटुंबाची भेट घेतली. याप्रसंगी आनंद भिमटेसह भिसी येथील प्रतिष्ठित नागरिक मोहम्मद अलीम साहब, सलीम तुर्के सर ( मुख्याध्यापक ), सलील मुंगले उपस्थित होते.

या मदत उपक्रमात वशिष्ठ खोब्रागडे, राहुल कुलकर्णी, नितीन चांदुरकर, डॉ. अरविंद काळे, डॉ. शरद मेश्राम, वंदना पाझारे, आणि आनंद भिमटे यांनी विशेष पुढाकार घेतला.

मदतीसाठी पुढे आलेले संवेदनशील मित्रपरिवार-

अरुण मुनेश्वर, यवतमाळ, प्रशांत टेम्भूर्णे, गडचिरोली, नितीन चांदुरकर, वर्धा, राहुल कुलकर्णी, संभाजीनगर, वंदना एस. डांगे/पाझारे, चंद्रपूर, आनंद भिमटे, वशिष्ठ खोब्रागडे, भावना गलांडे/निशाणे, हिंगणघाट, मनीषा देशमुख, अमरावती, प्रकाश बोरकर, गोंदिया, उज्ज्वला तरार, नागपूर, सोनाली विटकरे/पांडे, अमरावती, श्रीकृष्ण शेकोकार, अमरावती, डॉ. अरविंद काळे, प्रमोद पिलारे, वडसा, रोहिणी निलय, चंद्रपूर, देविदास डाकुलगे, हरिश्चंद्र रंधये, कु. लता रामटेके, नागपूर, संजय खोब्रागडे, ब्रह्मपुरी, नारायण निवरकर, बीड, अनिल माठे, मनीषा मोहितकर/गौरकार, घुग्घुस, राजीव कांबळे, भंडारा, डॉ. शरद मेश्राम, अर्जुनी मोरगाव, गोंदिया, अहमद हुसैन, अड्याळ, भंडारा, नवनाथ माळी, नाशिक, उत्तम साबळे, उज्ज्वला पेटकर/कांबळे, चंद्रपूर, रामेश्वर धंदर, मूर्तिजापूर, अकोला, दत्तू मंडलवार, अनंता कोहाळे, आरमोरी, महेंद्र रुखमोडे, आरमोरी, डॉ. कोमल ठाकरे, नागपूर, भगवान बी. बन्सोड, पेंढरी, ता. सिंदेवाही, जि. चंद्रपूर, प्रा. प्रभाकर बुरांडे, गडचिरोली, नरेश तरारे सर, राजेशकुमार सारंगपुरे, तिरोडा, पुरुषोत्तम राऊत सर, वाशिम, राजेश भोयर, राळेगाव, मनोज नंदनवार, शलाका टाकळकर /बोकारे मॅडम

मैत्रीचा हात, माणुसकीचा आधार!

रवी आज आपल्यात नसले, तरी त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी होत मित्रांनी दिलेला मदतीचा हात ही खऱ्या मैत्रीची आणि सामाजिक बांधिलकीची जिवंत साक्ष आहे. आर्थिक मदतीची रक्कम कदाचित त्यांच्या दुःखाची भरपाई करू शकणार नाही; मात्र या कठीण प्रसंगी आपण एकटे नाही, आपल्यासोबत आपले माणसं आहेत, हा विश्वास नन्नावरे कुटुंबाला निश्चितच दिलासा देणारा ठरणार आहे.

मैत्रीचा ऋणानुबंध जपत माणुसकीचे नाते अधिक घट्ट करणाऱ्या बी. एड. १९९९-२००० बॅचच्या सर्व मित्रांचे हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.