राजकीय

आमदार विजय रहांगडाले यांच्या मध्यस्थीने मृतकाच्या कुटुंबीयांना १५ लाख रुपयांची मदत; पत्नीला प्रतिमहा १६ हजार रुपये वेतनाची नोकरी

तिरोडा :-  अदानी पॉवर लिमिटेड, तिरोडा अंतर्गत कार्यरत असलेल्या पॉवरमॅक कंपनी लिमिटेडमध्ये दिनांक १५ नोव्हेंबर २०२६ रोजी कामावर कार्यरत असताना सुकडी येथील अमर मेश्राम (वय ३१ वर्षे) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे मेश्राम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांसमोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.सदर घटनेची माहिती मिळताच तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून पॉवरमॅक कंपनी लिमिटेडचे प्रशासन व मृतकाच्या कुटुंबीयांमध्ये मध्यस्थी केली. मृतकाच्या कुटुंबाला योग्य आर्थिक मदत मिळावी तसेच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरळीत व्हावा, यासाठी आमदारांनी कंपनी प्रशासनासोबत बैठक केली आमदार विजय रहांगडाले यांच्या मध्यस्थीने झालेल्या चर्चेनंतर कंपनी प्रशासनाकडून मृतक अमर मेश्राम यांच्या कुटुंबीयांना एकूण १५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार १४ लाख रुपयांचा धनादेश व १ लाख रुपये रोख स्वरूपात कुटुंबीयांना देण्यात आले.याशिवाय मृतकाच्या पत्नीला पॉवरमॅक कंपनी लिमिटेडमध्ये प्रतिमहा १६ हजार रुपये वेतनाची नोकरी देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. त्यामुळे कुटुंबाला आर्थिक मदतीसोबतच नियमित उत्पन्नाचे साधन उपलब्ध होणार आहे.या मदतीमुळे संकटाच्या काळात मेश्राम कुटुंबाला मोठा आर्थिक आधार मिळाला आहे.

एखाद्या कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना आर्थिक व सामाजिक आधार मिळणे आवश्यक आहे. याच भावनेतून आमदार विजय रहांगडाले यांनी पुढाकार घेऊन कंपनी प्रशासनाशी समन्वय साधत पीडित कुटुंबाला मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.कामगारांच्या सुरक्षिततेसोबतच त्यांच्या कुटुंबीयांच्या भविष्याची जबाबदारीही महत्त्वाची आहे. संकटाच्या काळात पीडित कुटुंबाला आधार मिळवून देणे ही आपली सामाजिक बांधिलकी आहे, अशी भूमिका आमदार विजय रहांगडाले यांनी व्यक्त केली.

या प्रसंगी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार प्रशांत पडोळे, जी.प.सदस्य जगदीश बावनथडे, प.स.सदस्य विजय बिन्झाडे,कृऊबास संचालक, अनिल भगत, ओम पटले, विक्की जगणे, खुमेंद्र रहांगडाले, सरपंच राजु ठाकरे व अदानी समुहाचे स्टेशन हेड व कर्मचारी उपस्थित होते.