तिरोडा शहरात अमली पदार्थांची खुलेआम विक्री; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..!
तिरोडा : –तिरोडा शहर परिसरात अवैधरित्या अमली पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने शहरातील वातावरण चिंताग्रस्त बनले आहे. विशेष म्हणजे शहरातील मुख्य चौकाजवळ तसेच पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावरच गांजा व इतर अमली पदार्थांची खुलेआम विक्री होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनात भयग्रस्त वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
शहरातील कुंभारे लान परिसरात सायंकाळच्या वेळी दारुड्यांच्या मैफिली रंगत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या परिसरातून ये-जा करणाऱ्या सामान्य नागरिकांना, महिला व विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची तक्रार स्थानिकांनी व्यक्त केली आहे. अनेकदा मद्यधुंद अवस्थेतील व्यक्तींमुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण होत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तसेच शहरातील इतर काही भागांमध्येही अमली पदार्थांची विक्री सुरू असल्याचे बोलले जात आहे. युवकांमध्ये वाढत असलेले व्यसन आणि त्यातून उद्भवणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे पालक वर्गामध्येही चिंता वाढली आहे. पोलीस प्रशासनाने अशा अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
दरम्यान, यासंदर्भात विचारणा केली असता पोलीस निरीक्षक अमित वानखेडे यांनी “अवैध अमली पदार्थ विक्रीविरोधात पोलीस प्रशासनाकडून नियमित कारवाया करण्यात येत आहेत. अशा प्रकारच्या गैरकृत्यांवर लक्ष ठेवण्यात येत असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल,” असे सांगितले.
