रावणवाडी त्रिमूर्ती चौकात वाहतूक कोंडी; ट्रक चालकांमध्ये हाणामारी, नागरिक त्रस्त
गोंदिया:- गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या रावणवाडी ते गोंदिया महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे परिसरातील नागरिक व प्रवाशांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अद्याप या महामार्गाचा केवळ अर्धाच भाग तयार करण्यात यश आले असून उर्वरित रस्त्याचे काम संथगतीने सुरू आहे. परिणामी रस्त्यालगत असलेल्या गावांमध्ये, विशेषतः चौकांच्या ठिकाणी, वाहतुकीची गंभीर कोंडी निर्माण होत आहे.
अशीच एक घटना दिनांक ९ मे रोजी रावणवाडी येथील त्रिमूर्ती चौकात घडली. वाहतुकीच्या कोंडीत अडकलेल्या दोन ट्रक चालकांमध्ये किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला. हा वाद इतका वाढला की दोन्ही चालकांमध्ये टोकाचे भांडण होऊन मारहाणीचा प्रसंग घडला. या प्रकारामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळे इतर प्रवाशांना आपली वाहने जागेवरच थांबवून ठेवावी लागली. अनेक प्रवासी तासन्तास वाहतूक कोंडीत अडकून पडल्याने त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. विशेष म्हणजे या ठिकाणी कोणताही पोलीस बंदोबस्त किंवा वाहतूक नियंत्रित करणारे पोलीस कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे परिस्थिती आणखी बिघडल्याचे नागरिकांनी सांगितले.
स्थानिक नागरिकांच्या मते, महामार्गाच्या कामातील विलंबामुळे रोजच अशा प्रकारच्या घटना घडत असून सामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावर सतत सुरू असलेली वाहतूक कोंडी, धुळीचे प्रमाण आणि वाहतुकीतील गोंधळ यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात नाराजी वाढत आहे.
