General

मोरवाही प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवेचा बोजवारा..!

रुग्णांना तासन्तास प्रतीक्षा; कर्मचारी उशिराने येत असल्याचा आरोप 

 

गोंदिया :- जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील ढिसाळ कारभाराचे एक गंभीर उदाहरण तालुक्यातील मोरवाही येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात समोर आले आहे. शासनाने बाह्य रुग्ण तपासणीची वेळ सकाळी साडेआठ वाजेपासून निश्चित केलेली असतानाही येथे कर्मचारी व अधिकारी वेळेत उपस्थित राहत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि रुग्णांनी केला आहे. त्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना गेटबाहेरच प्रतीक्षा करण्याची वेळ येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

दिनांक 23 मे रोजी या प्रकाराचे प्रत्यक्ष चित्र पाहायला मिळाले. सकाळच्या वेळेत अनेक रुग्ण आरोग्य केंद्राच्या गेटवरच उभे राहून कर्मचारी येण्याची वाट पाहत होते. त्यामध्ये पोटदुखीच्या त्रासाने व्याकुळ झालेला एक वृद्ध व्यक्ती गेटवरच गालावर हात ठेवून बसलेला दिसून आला. त्यांना विचारणा केली असता, “आरोग्य सेवा देणारेच वेळेत येत नसतील तर आम्ही करायचे काय?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, आरोग्य केंद्रातील अनेक कर्मचारी परिसरातीलच शासकीय निवासस्थानी राहत असूनही ते वेळेत केंद्रात पोहोचत नाहीत. साडेआठ वाजता सुरू होणारी सेवा प्रत्यक्षात साडेनऊ वाजल्यानंतरच सुरू होत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ग्रामीण भागातील गरीब व गरजू रुग्णांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीबाबत विचारले असता, “मेडिकल ऑफिसर यांच्या क्वार्टरमध्ये आंघोळीचे पाणी नसल्याने उशीर होत आहे,” असे कारण देण्यात आल्याची माहिती समोर आली. मात्र अशा कारणांमुळे रुग्णसेवा प्रभावित होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

सदर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल खोब्रागडे यांच्या कार्यपद्धतीबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. केंद्रातील कामकाजावर योग्य नियंत्रण नसल्याने कर्मचारी मनमानी करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. तसेच या केंद्राअंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रांमध्येही आरोग्य सेवा कितपत प्रभावीपणे दिली जात असेल, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी झाल्यास अनेक अनियमितता समोर येऊ शकतात. मात्र वारंवार तक्रारी होऊनही संबंधितांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढले आहे. जिल्हा आरोग्य विभागाकडून मिळणाऱ्या कथित अभयामुळेच हा प्रकार सुरू असल्याची चर्चा परिसरात रंगत आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना मूलभूत आरोग्य सेवा वेळेत आणि योग्य पद्धतीने मिळणे ही शासनाची जबाबदारी आहे. मात्र मोरवाही प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिस्थिती पाहता, आरोग्य विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.