अड्याळातील स्मशानभूमी मार्गावरील अतिक्रमण अखेर जमीनदोस्त,महसूल व पोलिसांची धडक कारवाई!
अमित रणदिवे /भंडारा:- भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याळ येथे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला स्मशानभूमीच्या मुख्य रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमणाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. तहसीलदारांच्या आदेशानुसार महसूल आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवून हे अतिक्रमण जेसीबीच्या साहाय्याने पूर्णपणे उध्वस्त केले.
स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर देवानंद जागो गभणे यांनी शासकीय जमिनीवर (शेत गट क्र. ९९७ व गट क्र. १५६९/१) तारेचे कुंपण लावून बेकायदेशीर अतिक्रमण केले होते. यामुळे अंत्ययात्रा नेतांना ग्रामस्थांना मोठ्या अडचणी येत होत्या. स्थानिक रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते वामनराव लारोकर यांनी याविरोधात प्रशासनाकडे रीतसर दाद मागितली होती.
अतिक्रमण सिद्ध झाल्यावर तहसीलदार किरण वगासकर यांच्या नेतृत्वाखालील प्रशासनाने कारवाईचे आदेश दिले होते. मात्र, जागेवर गव्हाचे पीक उभे असल्याने फेब्रुवारी २०२६ अखेरपर्यंत संबंधित शेतकऱ्याला लेखी हमीवर मुदत देण्यात आली होती.
दिलेली मुदत संपूनही अतिक्रमण न हटवल्यामुळे, मंडळ अधिकारी नत्थु शेंडे आणि स्थानिक तलाठी यांच्या उपस्थितीत, पोलिसांच्या कडक पहाऱ्यात जेसीबी लावून हे अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले. उर्वरित अतिक्रमण दुसऱ्या दिवशी काढले जाणार असल्याची माहिती आहे.
या कारवाई दरम्यान ग्रामविकास अधिकारी पौर्णिमा साखरे, सरपंच किंवा उपसरपंच यांपैकी कोणीही उपस्थित नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
कित्येक वर्षांचा हा प्रश्न सुटल्याने नागरिक समाधानी असले, तरी गावातील तलाव, बोळी, शासकीय जागा आणि गावातील मुख्य वर्दळीचे रस्ते आणि महामार्गावरील इतर सामाजिक कार्यकर्ते, राजकीय व्यक्ती व व्यापाऱ्यांच्या अतिक्रमणांवर प्रशासन अशीच धडक कारवाई कधी करणार? असा संतप्त सवाल आता अड्याळवासीय करत आहेत.
