दोन मोठ्या सजांंचा प्रभार एकाच तलाठ्याकडे; नागरिकांची गैरसोय, स्वतंत्र नियुक्तीची मागणी
राजू फुंडे प्रतिनिधी, सालेकसा
अतिदुर्गम व नक्षलग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सालेकसा तालुक्यातील आमगावखुर्द व पिपरिया या दोन मोठ्या तलाठी सजांचा प्रभार सध्या एकाच तलाठ्याकडे असल्याने परिसरातील नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. सातबारा उतारा, नमुना क्रमांक ८-अ, फेरफार नोंदी, उत्पन्न प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे, पीकपाणी नोंदी तसेच इतर महसुली कामांसाठी नागरिकांना वारंवार कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत.
आमगावखुर्द तलाठी कार्यालयात तलाठी अनेकदा दुपारी २ वाजल्यानंतर येत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. सकाळपासून विविध गावांतील नागरिक कार्यालयात येऊन प्रतीक्षा करीत असतात; मात्र तलाठी पिपरिया कार्यालयात असल्याचे सांगितले जाते. फोनवर संपर्क साधल्यास “मी पिपरिया कार्यालयात आहे, तुम्ही दुपारी २ वाजल्यानंतर या,” असे सांगितले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
या दोन्ही सजांमध्ये मोठ्या प्रमाणावर गावांचा समावेश असून, शेतकरी, विद्यार्थी, महिला, वृद्ध नागरिक तसेच विविध शासकीय योजनांसाठी कागदपत्रांची आवश्यकता असलेल्या नागरिकांना वेळेवर सेवा मिळत नाही. विशेषतः सातबारा, नमुना ८-अ, फेरफार उतारे, वारस नोंदी, पीकपाणी नोंदी व इतर महसुली कागदपत्रांसाठी नागरिकांना दिवसभर प्रतीक्षा करावी लागत आहे.
एका तलाठ्याकडे दोन मोठ्या सजांचा प्रभार असल्याने दोन्ही कार्यालयांतील कामकाजावर परिणाम होत असून नागरिकांचा वेळ, पैसा व श्रम वाया जात आहेत. अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागातील नागरिकांना तालुका ठिकाणी किंवा कार्यालयात वारंवार येणे आर्थिकदृष्ट्याही परवडणारे नाही.
त्यामुळे आमगावखुर्द व पिपरिया या दोन्ही तलाठी सजांसाठी स्वतंत्र तलाठ्यांची तातडीने नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. नागरिकांना वेळेवर महसुली सेवा मिळावी व कार्यालयीन कामकाज सुरळीत व्हावे यासाठी जिल्हा प्रशासन व महसूल विभागाने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
