गोंदिया विमानतळ धावपट्टी बांधकाम घोटाळा: एएआयच्या सहाय्यक महाव्यवस्थापकासह कंत्राटदाराविरुद्ध सीबीआयकडून गुन्हा दाखल
नागपूर / गोंदिया:- गोंदिया जवळील बिरसी विमानतळावरील धावपट्टी आणि नागरी बांधकामांमध्ये झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मोठी कारवाई केली आहे. सीबीआयच्या नागपूर भ्रष्टाचार प्रतिबंधक शाखेने भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे (AAI) सहाय्यक महाव्यवस्थापक (AGM – सिव्हिल इंजिनिअरिंग) संजीव कुमार सिंग यांच्यासह मध्य प्रदेशातील एका कंत्राटदार कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे विमानतळ प्राधिकरणात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिरसी विमानतळावरील धावपट्टी क्रमांक २२ च्या विस्तारीकरण आणि सीमा बांधकामाच्या कामात हा घोटाळा झाला आहे. सीबीआयचे पोलीस अधीक्षक (SP) रिषीकेश सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात सध्या कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
बनावट बिले आणि निकृष्ट साहित्य
हा संपूर्ण गैरव्यवहार ऑगस्ट २०२३ ते फेब्रुवारी २०२४ दरम्यान झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. विमानतळ प्राधिकरणाचे एजीएम संजीव कुमार सिंग यांनी मध्य प्रदेशातील बालाघाट येथील ‘मेसर्स रायसिंह अँड कंपनी’ या कंत्राटदार फर्मशी संगनमत केले. आरोपींनी अधिकृत सरकारी रेकॉर्ड म्हणजेच ‘मोजमाप पुस्तकात’ (Measurement Book) फेरफार करून कंत्राटदाराला निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्याची मुभा दिली. एवढेच नव्हे तर, बनावट बिले तयार करून ती मंजूर देखील करण्यात आली.
शासनाची कोट्यवधींची आर्थिक फसवणूक
या नागरी कामाची प्रत्यक्ष किंमत सुमारे ₹३.५ कोटी रुपये इतकी होती. मात्र, अधिकाऱ्यांनी नियमबाह्य पद्धतीने कंत्राटदाराला १ कोटी १५ लाख २५ हजार ५८८ रुपये अतिरिक्त अदा केले. याशिवाय, कंत्राटदाराकडून तब्बल ₹९२.२९ लाख रुपये वसूल करणे बाकी असतानाही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले, ज्यामुळे शासनाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
विविध कलमांन्वये गुन्हे नोंद
या प्रकरणात सीबीआयने संजीव कुमार सिंग, मेसर्स रायसिंह अँड कंपनी तसेच इतर अज्ञात शासकीय अधिकारी आणि खाजगी व्यक्तींविरुद्ध नियमित गुन्हा (Regular Case) दाखल केला आहे. आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम १२०-बी (गुन्हेगारी कट रचणे), ४२० (फसवणूक), ४७७-ए (हिशोबात फेरफार करणे) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सीबीआयकडून सध्या संबंधित कागदपत्रे, बँक व्यवहार आणि कंत्राट मंजुरीच्या प्रक्रियेची सखोल चौकशी केली जात आहे. या तपासादरम्यान विमानतळ प्राधिकरणातील आणखी काही बड्या अधिकाऱ्यांची किंवा खाजगी व्यक्तींची नावे समोर येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
