रानटी कुत्र्यांच्या हल्ल्यात काळविटाचा मृत्यू; गोंदिया सहवन क्षेत्रातील माकडी येथील घटना
गोंदिया, 18 जुलै : गोंदिया सहवन क्षेत्रातील मौजा माकडी येथे शनिवारी (18 जुलै) दुपारी सुमारे 2 वाजताच्या सुमारास रानटी कुत्र्यांच्या हल्ल्यात एका काळविटाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. काळवीट हा शेड्युल वन चा प्राणी असल्यामुळे तसेच दिवसेंदिवस वाढत असलेल्या वन्य प्राण्यांच्या घटनांमुळे सदर सदर प्रश्न अधिकच गंभीर बनत चाललेला आहे. लवकरच घटनेची गंभीरता लक्षात घेऊन वनविभाग त्यावर ठोस पावले उचलेल अशी आशा जनसमुदायाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माकडी परिसरात फिरत असलेल्या काळविटाचा रानटी कुत्र्यांच्या टोळीने पाठलाग केला. जीव वाचविण्याचा प्रयत्न करूनही अखेर कुत्र्यांनी काळविटावर हल्ला करून त्याची शिकार केली. या हल्ल्यात काळविटाचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच गोंदिया सहवन क्षेत्राचे सहाय्यक मुकेश भांडारकर यांनी कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वन विभागाने पंचनामा करून मृत काळविटाचे शव पुढील वैद्यकीय तपासणीसाठी दासगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात हलविले. तेथे शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करून वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली.
वन विभागाने नागरिकांना वन्यप्राण्यांच्या हालचाली दिसल्यास त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास न देता तात्काळ वन अधिकाऱ्यांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे. तसेच परिसरात वाढत असलेल्या रानटी कुत्र्यांच्या संख्येमुळे वन्यजीवांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.
पर्यावरणप्रेमी आणि वन्यजीव अभ्यासकांनी अशा घटनांकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले आहे. वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवास सुरक्षित ठेवणे, रानटी कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवणे आणि वन्यजीव संरक्षणासाठी समन्वयाने उपाययोजना राबविणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
