30 टन तांदूळ भरलेला ट्रक चोरी; चालकाला झाडाला बांधून चोरट्यांनी नेला ट्रक, बालाघाटमध्ये वाहनाचा शोध
गोंदिया | प्रतिनिधी
गोंदिया जिल्ह्यातील रावणवाडी पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या धाडसी चोरीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दिनांक 17 जुलै रोजी पहाटे सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास सावरी बस स्टॉपजवळ उभा असलेला UP 70 FT 0477 क्रमांकाचा, सुमारे 30 टन तांदूळ भरलेला ट्रक अज्ञात चोरट्यांनी चोरी करून नेल्याची घटना उघडकीस आली.
प्राथमिक माहितीनुसार, ट्रकमधील चालकाला चोरट्यांनी जबरदस्तीने खाली उतरवून जवळील झाडाला दोरीने बांधून ठेवले. त्यानंतर चोरट्यांनी ट्रकसह घटनास्थळावरून पलायन केले. चालकाची सुटका झाल्यानंतर ही माहिती पोलिसांना देण्यात आली.
पोलिसांनी तात्काळ सुरू केले शोध अभियान
घटनेची माहिती मिळताच रावणवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास शेवते यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आपल्या पथकासह तात्काळ तपासाची सूत्रे हाती घेतली. विविध ठिकाणी नाकाबंदी करून तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे ट्रकचा शोध सुरू करण्यात आला.
बालाघाट जिल्ह्यात ट्रक सापडला
पोलीस निरीक्षक रामदास शेवते यांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरीला गेलेला ट्रक मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील खैरलांजी परिसरात शोधून काढण्यात आला. मात्र, ट्रकमध्ये भरलेला 30 टन तांदूळ आधीच उतरवून त्याची विल्हेवाट लावण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
आरोपींचा शोध सुरू
या प्रकरणात तांदळाची विल्हेवाट नेमकी कुठे लावण्यात आली, चोरीमागे किती जणांचा सहभाग आहे आणि या गुन्ह्यामागे संघटित टोळीचा हात आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. घटनास्थळावरील पुरावे, सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
पोलिसांसमोर मोठे आव्हान
चालकाला झाडाला बांधून ट्रक पळविण्याची पद्धत पाहता ही घटना पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आंतरराज्यीय स्वरूपाचा हा गुन्हा असल्याने महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश पोलिसांमध्ये समन्वय साधून तपास सुरू आहे.
पुढील तपास सुरू
या प्रकरणाचा पुढील तपास रावणवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास शेवते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
