स्वास्थ

चिचगाव येथे पशुधन आरोग्य व लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न

 गोरेगाव :–  तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालय, गोरेगाव यांच्या वतीने दि. १५ जुलै रोजी सकाळी ८ वाजता चिचगाव येथे पशुधनासाठी औषधोपचार, वंध्यत्व निदान व उपचार तसेच लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराला गावातील पशुपालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी सरपंच भूमेश्वरी अंगले उपस्थित होत्या. यावेळी तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालय, गोरेगाव येथील सहाय्यक आयुक्त डॉ. गिरीश गभणे, ए.जी. चेन्नई, गोपीनाथ सहारे, अजिंक्य शहारे, निलेश भास्कर, गावातील पशुसखी कोल्हे मॅडम, राहंडाले मॅडम तसेच अनेक पशुपालक उपस्थित होते.

शिबिरादरम्यान जनावरांना विविध पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. यामध्ये औषधोपचार, रोगप्रतिबंधक लसीकरण, कृत्रिम रेतन, गर्भधारणा तपासणी, जंतनिर्मूलन तसेच वैरण वाटप करण्यात आले. पशुपालकांच्या जनावरांची तपासणी करून आवश्यक उपचार व मार्गदर्शनही करण्यात आले.

या उपक्रमामुळे पशुधनाचे आरोग्य सुधारण्यास, संसर्गजन्य रोगांवर नियंत्रण ठेवण्यास तसेच पशुपालकांना आधुनिक पशुसंवर्धनाबाबत माहिती मिळण्यास मोठी मदत झाली. उपस्थित पशुपालकांनी या उपक्रमाचे स्वागत करत अशा शिबिरांचे नियमित आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.