स्वास्थ

बिरसोला उपकेंद्रात सामुदायिक आरोग्य अधिकारी गैरहजर; पावसाळ्यात रुग्णांची गैरसोय

गोंदिया :- तालुक्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बिरसोला येथे दिनांक 20 जुलै रोजी सामुदायिक आरोग्य अधिकारी (सीएचओ) डॉ. पटले हे कर्तव्यावर अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आले. सध्या पावसाळ्यामुळे शेतीची कामे वेगात सुरू असून शेतकरी दिवसभर शेतात कार्यरत आहेत. या काळात सर्पदंश, विंचूदंश तसेच इतर विषारी कीटकांच्या चाव्याच्या घटना घडण्याची शक्यता अधिक असते. अशा आपत्कालीन परिस्थितीत नागरिक तातडीने आरोग्य उपकेंद्रात उपचारासाठी धाव घेतात.

मात्र संबंधित अधिकारी उपस्थित नसल्याने उपचारासाठी आलेल्या रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची अधिक माहिती घेतली असता, संबंधित सामुदायिक आरोग्य अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारची अधिकृत रजा घेतलेली नसल्याचे त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. तरीही ते उपकेंद्रात उपस्थित नसल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पावसाळ्यात ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अखंड सुरू राहणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या अनुपस्थितीची चौकशी करून संबंधितांवर आवश्यक प्रशासकीय कारवाई करावी, तसेच उपकेंद्रात वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी नियमित उपस्थित राहावेत, अशी मागणी परिसरातील नागरिक व शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.